खरं आहे. माझं असं मुळीच म्हणणं नाही की मी काही विशेष करतोय. मी लिहिल्याप्रमाणे "ह्या सगळ्यामागचा उद्देश एकच; मी मराठी आहे आणि "आमच्यात असं असतं" हे सगळ्यांना बोंब मारून सांगणे !"

वेलणकरांसारखं किंवा भांडारकरांच्या अनुदिनीसारखं काही करण्याची माझी तांत्रिक कुवत नाही आणि करवण्याइतकी आर्थिक कुवत तर अजिबात नाही. अश्या वेळेस, माझी "मराठी" म्हणून ओळख जपण्यासाठी, माझं मराठीपण अभिमानाने मिरवण्यासाठी मी हे करतो. "मी एकादशीचा उपास करतो" मधे "आणि का करतो ते सांगितलं" हे तुम्ही वाचलं नाहीत. माझ्या अमराठी सहकाऱ्यांना ज्ञानेश्वर, तुकाराम ही नावं माझ्यामुळे समजली. जे वर्षानुवर्षं पुण्यात राहून एरवी मराठी बोलत नाहीत अशी लोकं माझ्याशी मोडकं तोडकं का होईना, मराठीत बोलतात हे काही कमी आहे?

आमचा गणेशोत्सव, आमचे शिवाजीमहाराज, आमच्या लताबाई, आमचे पु लं, आमचा जरीपटका, आमचे ज्ञानेश्वर असं तुम्हाला लोकांना सांगावंसं नाही वाटत ? मला वाटतं आणि म्हणून मी वरच्या गोष्टी करतो.