डॅनियल जोन्ज़ यांची "इंग्लिश प्रोनन्सिएशन डिक्शनरी" ही इंग्रजी शब्दांच्या ब्रिटिश उच्चारांबाबतीत आधारभूत मानली जात असते किंवा असे. तिच्या प्रस्तावनेत त्यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत.
१. ते म्हणतात की डिक्शनरीतले उच्चार (तसेच इतरही व्याकरण, इ.) हे वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) असतात व मानावेत, आदेशात्मक (नॉर्मेटिव्ह) नव्हेत. त्यांनी हे अत्यंत स्पष्ट शब्दात लिहिलेले आहे की त्या डिक्शनरीत दिलेले उच्चार हे दक्षिण इंग्लंड मध्ये राहणाऱ्या पब्लिक स्कूल मध्ये शिकलेल्या एका विशिष्ट वर्गातील लोकांत केले जाणारे आहेत. त्यांचे अनुकरण करावे किंवा केले पाहिजे असा त्याचा विपरीत अर्थ कोणी लावू नये.
ते उच्चार बरोबर किंवा योग्य आहेत असे म्हणण्याऐवजी ते RP म्हणजे रिसीव्हड प्रोनन्सिएशन म्हणजेच असे उच्चार जे जास्तीत जास्त लोकांना समजतील या वर्गात मोडतात असे म्हणणे उचित.
२. ते असेही सांगतात की इतर देशातल्या लोकांनी त्या पुस्तकात दिलेल्या उच्चारांचे अनुकरण करण्याऐवजी आपापल्या देशातील RP प्रमाणे उच्चार करणे हे अधिक योग्य आहे.
(इतके लिहिले असूनही लोक त्यांनी दिलेल्या उच्चारांना आदर्श मानायचे सोडत नाहीत.)
एका अधिकारी व्यक्तीने दिलेल्या वरील शहाणपणाच्या सल्ल्याचा विचार करता व परकीय भाषांतील शब्दांच्या बाबतीत नसलेली एकवाक्यता लक्षात घेता अचूक उच्चारानुवर्ती लेखनाचा आग्रह न धरलेला बरा असे मला वाटते.

उच्चाराच्या बाबतीत ऑक्सफ़र्ड डिक्शनरी (जुनी आवृत्ती) ही काहीशी अनवलंबनीय आहे, विशेषतः त्यांच्या "प्रोनन्सिएशन विदाउट रिस्पेलिंग" च्या हट्टामुळे. नव्या आवृतीत ध्वनिशास्त्रीय चिन्हांनी उच्चार मांडलेले आहेत असे ऐकतो. चित्तरावांनी काळजी घ्यावी अशी एक अनाहूत सूचना.
बीबीसीवाल्यांचे उच्चार आदर्श मानले जातात, उच्चारांसाठी त्यांचे स्वतःचे वेगळे संदर्भपुस्तक आहे असे ऐकले आहे, जर ब्रिटिश उच्चारांना प्राधान्य (हे का?)द्यायचे असेल तर ते पुस्तक पाहिलेले चांगले.
आपल्या आकाशवाणीकडे असा काही संदर्भ आहे किंवा कसे हेही पहावे.
एकूण काम क्लिष्ट आहे.

जाता-जाताः
अ) "पारी" असा उच्चार केल्यास फ़्रान्समध्येही कोणाला कळेल की नाही याची शंका वाटते. तो उच्चार "पाघी (अव्हुलर ट्रिलिंग - टाळ्याशी टर्टर करून, थोडाफार उलटी काढताना जसा आवाज येतो त्याच्या जवळचा)" अशापैकी करावा लागेल. आणि तो दर वेळी असा(च) लिहायचा की काय?
"पॅरिस" लिहायचे असा निर्णय कोणत्या आधारावर घ्यायचा? इंग्रजी उच्चाराला झुकते माप का द्यावे?
ब) जर्मनीच्या जर्मन नावाचा उच्चार डॉइशलँड नसून डॉइच्लांड(किंवा ट) असावा असे वाटते.

निदान परकीय शब्दांच्या बाबतीत तरी आपलेच मन थोडे अधिक उदार करणे सोयीचे वाटते. पहा बुवा. (पृथ्वी चामड्याने मढवायची की पायात चपला घालायच्या?)
दिगम्भा