थेट मुद्द्याची गोष्ट करायची तर वार्षिक १२ डॉलर्स ही भारताबाहेरील मनोगतींसाठी ऐच्छिक वर्गणी तर २५० रुपये ही भारतातील मनोगतींसाठी ऐच्छिक वर्गणी [खरेतर देणगी] ठेवावी. या निमित्ताने अजूनही काही सुचत गेलं ते असं -
येथे लेखन / वाचन करण्यासाठी या वर्गणीचं बंधन नसावं. वर्गणीदारांना कुठलेही अधिक अधिकार नसावेत.
प्रशासकांना या देणगीचा विनियोग व्यावसायिक कारणासाठी करायचा नसेल [ते तसा करूही शकतात] तर प्रतिवर्षी या वर्गणीचा हिशोब त्यांनी सादर करावा. व सं‌.स्थळाचा खर्च वजा जाता दरवर्षी जमणारे पैसे कोणत्याही चांगल्या सामाजिक प्रकल्पाला मदत म्हणून द्यावेत.
मनोगतावर आपण सगळेच सक्रीय सामाजिक काम करण्याबाबत कुंपणावर आहोत. काही जण प्रत्यक्ष करणारे आहेत, काही करून चुकलेले आहेत, काही मधूनमधून करतात तर काहींना करायचं आहे; पण सोबत हवी आहे. फ़क्त बोलण्या / लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष काही करायला हवं हा सूर अधूनमधून लागतोच. या निमित्ताने एखादा सामाजिक प्रकल्प हा आपण मनोगताचा 'विषय' करावा. तेथे या अल्पस्वल्प आर्थिक मदतीबरोबरच ज्यांना शक्य आहे त्यांनी पाळीपाळीने गट करून शारीरिक योगदानही द्यावे.