मराठी जतन करण्याची तळमळ सच्ची असली तरी तसे करण्याचे मार्ग मला चुकीचे वाटतात. मोठ्यांदा आरती म्हटल्याने, उपास केल्याने मराठी कशी जतन होणार? त्यातही जर तुम्ही स्वतः ठार नास्तीक असाल तर अशी स्वतःची फसवणूक करून तुम्ही नेमके काय साधणार?
आमचा गणेशोत्सव, आमचे शिवाजीमहाराज, आमच्या लताबाई, आमचे पु लं, आमचा जरीपटका, आमचे ज्ञानेश्वर असं तुम्हाला लोकांना सांगावंसं नाही वाटत ? मला वाटतं आणि म्हणून मी वरच्या गोष्टी करतो.
मराठीचे जतन करण्यासाठी आधी मराठी लोकांनीच मराठी लिहीली - वाचली - बोलली पाहिजे. असे कुणाला काही सांगून मराठी तरणार नाही. आणि पालखीच्या नावाने बोंबलणाऱ्यांना लोक वारीला का जातात हे सांगूनही नाही किंवा तिळगूळ का वाटतात हे सांगूनही नाही. मला वाटते तुमचा मराठी भाषेचे जतन आणि मराठी संस्कृतीचे जतन यात गोंधळ होत आहे. ( यात पालखीच्या नावाने बोंबलणे बरोबर की चूक हा विषयच नाही ).
ज्यांना मराठी समजतं त्यांच्याशी मराठीतच बोलतो.
सहमत.
मग प्रश्न असा येतो की तुमच्या इतक्या मुद्द्यांना विरोध करणारा मी काय करतो? खरे सांगायचे तर फार काही नाही. अगदीच आठवून आठवून सांगायचं तर...
- रोज घरात मराठीच वर्तमानपत्र घेतो
- साप्ताहिक सकाळ, अंतर्नाद आणि अनुभव ही तीन नियतकालिके घेतो.
- मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असला तरी त्याला मराठी पुस्तके आणि 'मनोगत' वाचायला सांगतो.
- न चुकता वर्षाला किमान पाच हजार रुपयांची मराठी पुस्तके विकत घेतो.
- जेंव्हा जेंव्हा शक्य आहे तेंव्हा लोकांना / नातेवाईकांना / मित्रांना मराठी पुस्तके भेट देतो.
- मराठी गाण्यांच्या ध्वनीफिती विकत घेतो. मराठी नाटकांना आवर्जून जातो.
याचा मराठी संवर्धनाला किती उपयोग होतो माहिती नाही, पण माझ्या आवाक्यातले इतकेच आहे, असे मला वाटते.