समाजपुरुषांना काळाचे भान असणे गरजेचे आहे. भारतीय जनतेची मानसिकता लक्षात न घेता त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवासारखा उपक्रम सुरु करून देणे (मग त्या उपक्रमाचा हेतू कितीही उदात्त असो!), आणि त्याचे पुढे काय स्वरूप होईल याची कल्पना न करता येणे या टिळकांच्या  कृत्याची किंमत समाजाला आज द्यावी लागत आहे. टिळकांना समाजाची ही नाडी ओळखता यायला हवी होती. 'नंतर समाज बदलला' हे म्हणणे काही खरे नाही. टिळकांच्या काळातही इतकीच भुरटेगिरी सुरु होती. विवेकहीन समाज हा जाण न आलेल्या बालकासारखा असतो. त्याच्या हातात काय द्यायचे हे जाणत्या लोकांनी ठरवायचे असते.
ओमानच्या सुलतानाचे उदाहरण या संदर्भात आठवते. सुलतान कबूस हा तसा उदारमतवादी. त्याने ओमानला बराच पुरोगामी चेहरा दिला. पण इस्लामला निषिद्ध असलेलेल्या मद्याच्या विक्रीवरचे निर्बंध बाकी त्याने तसेच ठेवले. कारण मूळचा सागरी चाचेगिरीचा व्यवसाय असणाऱ्या लुटारू रक्ताच्या बलुची नागरिकांना अशी सवलत दिली तर देशात अराजक माजेल याची त्याला कल्पना होती. आजचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे हिडीस स्वरूप पहाता त्या काळात राष्ट्रीय एकात्मकतेसाठी म्हणून उपसलेले हे अस्त्र कधीतरी आपल्यावरच उलटेल हे टिळकांच्या लक्षात यायला हवे होते, असे वाटते. इतक्या विद्वान माणसाला आपल्या कृत्याची दूरगामी परिणाम दिसले नाहीत, हे आपले दुर्दैव!
अगदीच तद्दन फिल्मी उदाहरण द्यायचे तर अत्यंत फायदेशीर असूनही ड्रग्जचा व्यवसाय अमेरिकेत सुरु करू न देणारा गॉडफादर सांगता येईल.