'ढालगजभवानी' हा शब्द अनेक वेळा 'भोचक' वा 'पुढे पुढे मिरविणारी अशा अर्थाने वापरला जातो. मात्र या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तर जिला उद्देशून हा शब्द वापरला गेला तिला ते अभिमानास्पद वाटेल.
ढाल म्हणजे कवच, संरक्षक आवरण.
गज म्हणजे हत्ती.
भवानी म्हणजे आरंभ, आघाडी, कार्याला सुरुवात.
पूर्वीच्या काळी शत्रूच्या किल्ल्याला वेढा घातला जात असे. अनेक दिवस वेढा चालवूनही शत्रू शरण येत नाही म्हणताना निकराचा हल्ला म्हणजे 'सुलतानढवा' किंवा 'एल्गार' केला जात असे - म्हणजे सर्व शक्तिनीशी किल्ल्याचा दरवाजा भेदून आत शिरायचा प्रयत्न.
यासाठी मदमस्त हत्तींना मस्तकावर कवच चढवून किल्ल्याच्या दारावर मुसंडी मारायला लावले जात असे. प्रचंड ताकदीच्या हत्तीने दिलेल्या धडकांनी दरवाजा कोलमडून अखेर किल्ल्यात प्रवेश शक्य होत असे. यात मजबूत दरवाज्यावर लावलेल्या अणकुचीदार खिळ्यांची पर्वा न करता स्वामीच्या आज्ञेनुसार धडका देणाऱ्या हत्तीची भूमिका सर्वात महत्त्वाची.
तेंव्हा ढालगजभवानी म्हणजे परिणामांची तमा न बाळगता, अडचणींची पर्वा न करता ध्येयाप्रत पोचण्यासाठी पुढे सरसावलेली पराक्रमी स्त्री असा आहे.