<चौरिचोराच्या हिंसाचारानंतर सशस्त्र क्रांतीकारी चळवळीत सामिल होऊन आपले नाव आझाद असे बदलणाऱ्या या वीराने >
धन्यवाद प्रियाली,
तुझ्या वरील माहीतीत मी थोडी सुधारणा करू इच्छीतो. १९२१ साली चंद्रशेखर सिताराम तिवारी नामक मुलगा असहकार आंदोलनात सामील झाला. प्रथम प्रसंगी त्याला वय पाहून समज देउन सोडून देण्यात आले. पुन्हा सापडला तेव्हा त्याला दंडाधिकारी खारेघाट यांच्या पुढे उभे केले गेले. त्यांनी नांव विचारताच तो मुलगा म्हणाला 'आझाद'. वडीलांचे नाव? - 'स्वतंत्रता'. राहतोस कुठे ? - 'जेलखान्यात'. या उत्तरांनी संतप्त होउन खारेघाट यांनी त्या मुलाला बनारस तुरुंगात १५ फटक्यांची शिक्षा सुनावली. पोलीस फटके मारण्यापूर्वी त्याला तिकटीवर बांधू लागताच तो म्हणाला, याची गरज नाही, तुम्ही मारा मी उभा आहे. पोलीसही चकीत झाले. या फटक्यांना अट्टल गुन्हेगारही घाबरत असत.
फटके सुरु झाले. हा मुलगा प्रत्येक फटक्यागणीक 'वंदे मातरम' चा घोष करित होता. फटके संपल्यावर प्रथमोपचार नाकारून तो मुलगा आपल्या पायानी चालत बाहेर पडला. बनारस तुरुंगाबाहेर लहान मुलाला फटके मारल्यामुळे संतप्त जमाव जमला होता. लोकांनी या शूरवीराची मिरवणूक काढली व उस्फुर्त सत्कार केला. या प्रसंगी बोलताना पं. श्रीप्रकाश यांनी त्याचा उल्लेख 'आझाद' असा केला. तेव्हापासून तो वीर चंद्रशेखर आझाद या नावाने प्रसिद्ध झाला.