शिवाजी, शहाजी, जिजाबाई यांना देव्हाऱ्यात बसवून त्यांचे सर्व काही आदरणीय मानावे ह्या मताचा मी नाही. शिवाजी हा अत्यंत थोर राजा झाला. पण तो एक माणूसच होता. मुसलमानांनी महंमदाला जे स्थान दिले आहे ते मी शिवाजीला देऊ इच्छित नाही.
 भोसले घराण्याविरुद्ध काही बोलले तर बोलणाऱ्याची जीभ हासडा वा त्याला मुलाबाळांसकट नष्ट करा असे होऊ नये असे मला वाटते.
   शहाजीचे जिजाबाईला दूर ठेवणे मला खटकते हे नक्की. शिवाजी महाराजांना घडवण्यात, त्यांच्यावरील संस्कारात शहाजीचा नगण्य सहभाग होता असे मला वाटते. शहाजी व जाधव घराण्यात कमालीचे शत्रुत्व होते. भोसल्यांनी जाधवांच्या घरातील लोक मारले आहेत व जाधवांनी भोसल्यांच्या घरातील असे इतिहास सांगतो. त्यामुळे शहाजी व जिजाबाईत वितुष्ट आले असणे सहज शक्य आहे. शिवाजी बालवयाचा असताना तो स्वराज्य स्थापणार आहे, ते यशस्वी होणार आहे असा आडाखा बांधणे अशक्य होते. अनेक लोक तसे करताना मेले होते. त्यामुळे म्हणून जिजाबाई वेगळी रहात होती असे म्हणणे पटत नाही.
मात्र तोरणा, राजगड, शिरवळच्या मोहिमा झाल्यावर शहाजीला शिवाजीविषयी आदर/कौतुक वाटू लागले असणार. तेव्हाच कधीतरी शहाजीने (तह करण्याकरता )शिवाजीला कोंढाणा मुगलांना देऊन टाक असे सांगितले तेव्हा शिवाजी भयंकर संतप्त झाला होता असे पुरंदऱ्यांनी म्हटले आहे. 
 आपण उगाच सकारात्मक, नकारात्मकचा घोळ घालत आहात. इतिहासाला सत्य हवे असते. आणि तेच शोधले पाहिजे. शिवाजीचे कर्तृत्व इतके अफाट आहे की त्याला सत्याचे भय असायचे कारण नाही.