एखाद्याच्या मताला दुसऱ्याच्या मतापेक्षा जास्त किंमत म्हणजे लोकशाहीतील समानतेच्या महत्वाच्या मूल्याला छेद देण्यासारखे आहे. पदवी असलेल्या माणसाला राजकारणातले फार कळते हा दावा पोकळ आहे. माझ्या बहुतेक पदवीधर, डॉक्टर मित्र-मैत्रिणींना भारतीय राजकारणाच अजिबात गंधही नाहीये. आणि अगदी त्या विरुद्ध आमच्या भैय्या वॉचमनला बऱ्यापैकी राजकारण कळते. मुद्दा, शिक्षणाचा आणि राजकारणाच काही ही संबंध नाही.
सुशिक्षित माणसाच्या मताला जास्त किंमत हवी, << म्हणजे नक्की काय हवे ?
कर भरणाऱ्याच्या मताला जास्त किंमत हवी << कर भरणारे, शक्यतितका कर बुडवून/ चोरून, अगदी नाईलाजाने भरावा लागतो तितका कमीत-कमी कर भरतात. त्यांच्या मताला जास्त किंमत का द्यावी हे कळले नाही. आणी आजकाल भारतात जवळपास सर्वच गोष्टींवर कर आहे, रस्त्यावरचा पानवालाही कर भरतो. त्यामुळे कर भरणाऱ्याच्या मताला जास्त किंमत हे काही पटण्यासारखे नाही. देश आणि क्लब ह्यात फरक असतो.
आज अडाणी, उथळ लोकांची संख्या जास्त आहे. ते लोक कुठल्याही थिल्लर आणि सवंग प्रचाराला बळी पडतात आणि पुढारी भक्कम मते मिळवतात.
भारतात साक्षरतेचे प्रमाण वाढते आहे, नवीन नवीन प्रसारमाध्यमे लोकांची बऱ्यापैकी जनजागृती करतात. भारतीय मतदार भोळा असेल पण फक्त अशिक्षित आहे म्हणून त्याला काही कळत नाही असे म्हणणे योग्य ठरणार नाही, तसे नसते तर भारतात सत्तांतरे झाली नसती. मतदार वेळोवेळी आपली ताकद दाखवून देतो. आजकालच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर लढवल्या जाऊ लागल्या आहेत हे त्याचेच एक फळ आहे.
मुस्लिम मुल्लामौलवींच्या दाढ्या कुरवाळून, पाकिस्तानची थोरवी गाऊन मुस्लिम मतांचा गठ्ठा मिळतो. दलित वगैरे मंडळींना कोटा, शेतकऱ्यांना फुकट वीज इत्यादी मूर्खपणाची खैरात करुन लोकांनी निवडणुका जिंकल्याचे तर ताजेच उदाहरण आहे.
आमच्या इथे १९८५ च्या दरम्यान, रमजान अली शेक नावाच एक मनुष्य, मुस्लिम जास्त म्हणून सहज जिंकू म्हणून नगरपालिकेच्या निवडणूकीस उभा राहिला. समोर शिवसेनेने, ऍथोनी ब्रिटो नावाचा एक "काम करणारा" माणूस उभा केला. शिवसेना जिंकली. दलितांना कोट्याचे आमिष दाखवणारे, शेतकऱ्यांना मोफत विजेची घोषणा करणारे "सुशिक्षितच" आहेत नाही का ?
भारतातील सुशिक्षित नक्की भारतासाठी असे काय करतात की त्यांच्या मताला जास्त किंमत द्यावी हे जर स्पष्ट कराल का ? बहुतेक सुशिक्षित मत द्यायलाही जात नाहीत. निवडणूकीचा दिवस त्यांच्यासाठी "सुट्टी" असते. राजकारण ह्या त्यांच्यासाठी "घाणेरडा" विषय असतो. मनोगतवरही, राजकारण ( गेलं चुलीत ) असच लिहिले आहे.
आज भारताच पंतप्रधान जगातील कोणत्याही पंतप्रधानापेक्षा जास्त शिक्षण घेतलेला आहे. राष्टपती मुस्लिम, आणि पुन्हा उच्चशिक्षित. संसदेत अंगुठाछाप लोकांची संख्याही कमी होते आहे. हे सर्व, भारतातील अशिक्षित, अडाणी लोकांच्या मतांमुळेच. ह्याच समाजास अधिक चांगले शिक्षणाच्या संधी द्याव्यात की त्यांना अडाणी ठरवून आपल्या मतांना जास्त "किंमत" मागायची ? भारतात गेले काही वर्ष बरेच चांगले बदल होत आहेत. ते इंटरनेटवर बातम्यां वाचून कळण्यासारखे नाहीत. मतदार शिकतो आहे आणि, फुटीच्या राजकारणाला कंटाळला आहे. सध्याच्या रेल्वे-बॉम्बस्पोटांनंतर मुंबईत जराही धार्मिक तणाव निर्माण झाला नाही हे त्याचेच एक प्रतीक आहे. आज खरी गरज, स्वतःला सुशिक्षित, सुजाण नागरिकांनी राजकारणात उतरण्याची आहे. अश्या लोकांना मतदार नक्कीच उचलून धरेल.
जाता-जाता, राममंदिर ही भाजपने, सुशिक्षित, कर भरण्याच्या लोकांना दिलेली लाच नव्हती का ?
मयुरेश वैद्य.