लेखन, भाषण आणि विचारस्वातंत्र्य हे केवळ आपल्याला आहे आणि इतरांना नाही असा गोड गैरसमज केतकरांनी करुन घेतला आहे असे त्यांच्या या लेखावरून वाटते.
भारतीय पारपत्र (म्हणजे पासपोर्ट हो!) बाळगणाऱ्या प्रत्येकजण हा एक भारतीय नागरिक आहे. त्यामुळे तो त्याच्या देशातल्या सरकार-आणि-संस्थेबद्दल यथेच्छ टीका-कौतुक करू शकतो.
देशासाठी जितक्या कर्तव्यभावनेची मागणी/अपेक्षा पभांकडून ठेवण्यात येते तितकी कर्तव्यभावना देभांनी दाखवावी. भारतदेश जपान, चीन, अमेरिका यांना ओलांडून आरामात पुढे जाईल. आणि मग भारतदेशाला डॉलर, पौंड, दिनार, येन यांची गरजही पडणार नाही. देशातली सरकारी यंत्रणा इतर कोणत्याही देशापेक्षा कार्यक्षम असेल.
इतर देशातल्या सरकारी-निमसरकारी यंत्रणा पाहून देशातल्या यंत्रणा सुधारायला सांगणारे लोक मूर्ख आहेत असे वाटत असेल तर ते पभा तरी काय करणार बिचारे. माकडाचे करावे भले तर माकड म्हणते माझेच खरे!
आदरणीय विद्यमान राष्ट्रपती पभांना सांगतात की फक्त स्वतःचे पाहू नका देशाचे पहा. जॉन केनेडींचे वाक्य उद्धृत करतात. अहो ते सगळे ठीक आहे, पण स्वतःच्या मंत्रिमंडळात डोकावून पाहा. तिथे स्वतःच्या पुढच्या १०० पिढ्यांची ददात मिटवणारे मंत्री बसले आहेत. त्यांना अश्या संदेशाची जास्ती गरज आहे. इतकेच नाही तर त्यांची स्विस बँकांतली खाती गोठवून तो पैसा सरकार दरबारी जमा करा. जागतिक बँकेचे सगळे कर्ज एका झटक्यात फिटून जाईल.
मुंबईचे शांघाय करायला निघालेले पंतप्रधान, अहो तो मुंबईचा विमानतळ तरी पाहा. सौंदर्य वगैरे नंतर पाहू. एखाद्या विमानाला अपघात झाला तर त्या झोपड्यांतले किती लोक मरतील? का मरु देत, बांग्लादेशीच आहेत सगळे?! सहारा कंपनीचे एक विमान घसरले तर विमानवाहतूक पूर्ववत व्हायला ७२ तास लागतात? आंतर्राष्ट्रीय विमानतळ आहे का गंमत आहे? का आणखी एक चराऊ कुरण?
अहो ते सगळे जाउद्या, तुमच्या-आमच्या देशाचा नकाशा जगभर चुकीचा दाखवला जातो त्यासाठीतरी काहीतरी करा? तिथे का मूग गिळून बसले आहात गेली ५० वर्षे?
बर तेही जाउद्या, मतदार यादीत आमची नावे तरी बरोबर लिहा. तेही जमत नाही?!
बर, कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक? नाही!? रस्ते? नाही!?
बर, मग आमच्या घरी रोज २४ वीज देता? नाही!?
बर, मग पाणी? नाही!?
देशातली निम्मी जनता उपाशी पोटी - अर्धपोटी झोपत असताना देशाच्या नेत्यांना, आणि या साम्यवादी केतकरांना रात्री झोप लागतेच कशी?
केतकरही उपाशीपोटी झोपत असावेत बिचारे. पोटशूळ आहे ना त्यांना!