दहावीच्या पुस्तकातील लाल चिखल ही कथा मला तेंव्हा खूप भावली होती. एका शेतकऱ्याच्या मुलाच्या डोळ्यातून रंगवलेली कथा खूपच परिणामकारक झाली होती. अपार कष्टाने पिकवलेले लाल भडक टमाटर बाजारात मोठ्या आशेने विक्रिस ठेवल्यावर नेमके त्याच वेळेस बाजारात टमाटरांची आवक वाढल्याने मातीमोल किंमत येत आहे बघून त्यातच नाचून त्याचा लाल चिखल करणारा निराश शेतकरी हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहिला होता. त्या वयात ह्या कथेचा परिणाम इतका विलक्षण झाला होता की अजूनही कधी मी भाजी मंडई मध्ये गेलो तर भाव करत नाही.

त्याच बरोबर आण्णाभाऊ साठेंची 'स्मशानातील सोनं' ही कथा पण आठवते.त्यातला थरार मला खूपच आवडला होता. वरती दिलेल्या अनेक कवितांबरोबरच 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कुसुमाग्रजांची कविताही आठवते आहे... 

मराठी पुस्तकांबरोबच हिंदी पाठ्यपुस्तकातील 'मेरा छाता' नावाची कविता आमच्या वर्गाकडून इतक्या वेळा गाऊन घेतली होती की अजूनही लक्षात आहे.त्याचबरोबर काल कलुटा जादुगर हा धडा त्याच्या ह्या वेगळ्या नावामुळे चांगलाच लक्षात राहिला आहे. वर्गातील ज्यांचा गहूवर्ण अथवा सावळा वर्ण असणाऱ्यांच्या पोटात चांगलीच धडकी भरायची. कारण एकदा का हा धडा शिकवायला घेतला की त्यातल्या एकाचे तरी नामकरण 'काल कलुटा जादुगर' होणार हे नक्की होते.

हिंदी चा विषय निघालाच आहे तर इंग्रजीची पुस्तके, राम,सीता,यास्मिन, अहमद पण आठवत आहेत. 'यास्मिन'स बुलबुल' असा एक धडा आठवतो आहे.. असो त्यावर अधिक विषयांतर नको...  विषय मराठी पाठ्यपुस्तकातील उताऱ्यांचा आहे!!

वरुण