नमस्कार,

मनोगतसारख्या संकेतस्थळांचे व्यावसायिकीकरण झाल्यावर आत्ताच्या सदस्यांपैकी किती लोक त्याचे सदस्य राहू इच्छितात याविषयी चर्चा/मतचाचणी घ्यायला हरकत नाही. मला वाटते १ टक्का लोकही तशा परिस्थितीत पैसे भरणार नाहीत.

जर आपल्यासारख्या आहे रे वर्गातल्या लोकांचा माहितीजालात मराठीचे अस्तित्व टिकवण्यामध्ये एवढा उत्साह असेल, तर व्यावसायिक तत्त्वावर चाललेल्या सेवेला किती प्रतिसाद मिळेल आणि एकूणच या प्रयत्नातून मराठी भाषेचे आणि भाषिकांचे भवितव्य कसे उज़ळेल याविषयी टिप्पणीची गरज़ नाही.

मुळात आज़ नवनवीन प्रकारची business models वापरून ग्राहकांना खूश करण्याचे प्रयत्न होत असताना, आणि दुसर्या बाज़ूला मुक्त आणि खुल्या सॉफ्ट्वेअरसारख्या चळवळी एकूणच बौद्धिक संपदांच्या तत्त्वाला आव्हान देवून प्रस्थापित संस्थांना हलवून सोडत असताना, व्यावसायिक तत्त्वावर सेवा देवून केवळ मर्यादित समूहापर्यंत पोचण्याचा विचार हा माहितीमहाजालातील मराठीच्या मर्यादित अस्तित्वाला कमालीचा घातक ठरू शकतो. विशेषतः मनोगतसारख्या स्थळाने, की ज्याचा आधारच युनिकोडसारखे मुक्त (free) संशोधन आहे, त्याने तरी आपल्या प्रथमत्त्वाचा आदर राखायला हवा आणि कोणालाही त्याचा वापर करण्यापासून शक्यतोवर वंचित करू नये.

अर्थात जाहिराती, आणि खास (premium) सेवांसारख्या मार्गांतून उत्पन्न मिळवता येईल, पण त्यासाठी सदस्यसंखेत पुरेशी वाढ होणे गरज़ेचे आहे.

एकूणच सायबरसाक्षर मराठी जनांची संख्या आणि त्यांचे साधनवैपुल्य पाहता ते अशक्य नाही, फक्त उदासीनता आणि बेफिकीर वृती टाकायला हवी.

आपला,

मराठा