बायकांच्या कपाटातला 'पसारा' हा मोराच्या 'पिसाऱ्या'पेक्षा रंगीबेरंगी असतो. अर्थात, तितका विलोभनीय मात्र नसतो.
कधीही कपाट उघडलं (शक्यतो मी त्या भानगडीत पडत नाही, पण in case,) की बदाबदा १०-१२ विविध रंगांची, आकाराची, वयाची आणि स्वभावाची वस्त्रे जमीनीवर घरंगळतात.
'जुने न वापरातील कपडे टाकून का देत नाही?' असं करवादलेलं माझं वाक्य आता इतकं बोथट झालं आहे की 'आत्मक्लेश' ह्या व्यतिरिक्त त्याला कांही महत्त्व उरलेलं नाही. शेवटी, मी आक्षेप घेणं बंद केलं. परंतु.......
आता तर, आम्ही वापरत नसलेला प्लॅस्टिकचा टेबलक्लॉथ, जूनी पांघरूणं आणि वाणसामानच्या लाकडी हँडलच्या, खरखरीत, चौकोनी पिशव्याही माझ्या कपाटात आपले अस्तित्व दाखवायला लागल्या आहेत आणि संतापाचे कढ मला नव्याने येऊ लागले आहेत.
फ्रीज मध्ये, कोथिंबीर/पुदिन्याची हिरवी चटणी आणि डोक्याला लावायची मेंदी जर बाजूबाजूला नांदत असतील तर संताप नाही का येणार? घाईघाईत, पावाला मेंदी लावून खाल्ले जाईल ह्या भितीने, १००% खात्रीने पुदिन्याची चटणी लावलेली असली तरीही, मी वास घेतल्याशिवाय सँडविच खात नाही. डोक्याला मेंदी लावण्याची 'सोय' उरलेली नसल्यामुळे, चुकून कोथिंबीर/पुदीन्याची चटणी लावून टाळूचे तापमान वाढण्याची शक्यता नाही, हे नशिबच म्हणायचे. असो.

लिखाण उत्स्फूर्त आणि खुसखुशीत आहे. वाचताना मजा तर येतेच पण नकळत आपल्या घरातील वातावरणात घेऊन जाते.

अभिनंदन.