चला, त्यानिमित्तानी बरीच माहिती आणि नवे विचार कळले ! चिकू नी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्यापरीने गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करावा. मिलिंद जोशींचे इतर ठिकाणचे प्रतिसाद वाचले आणि इथल्या प्रतिसादाबद्दल वाईट वाटेनासे झाले (ह. घ्या!) ...(आयला हे ह. घ्या. ज्या कुणी शोधलंय त्याला माझा एकसमयावच्छेदेकरून शिरसाष्टांग दंडवत ! कमाल आहे !) तर सज्जनहो सांगणे असे की मी नुकताच माझ्या बंगाली मैत्रिणीबरोबर (आम्हालाही मैत्रीण असू शकते की !) तिच्या "कम्युनिटी"च्या 'पुण्यातल्या' एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं एक जण माझ्याशी मराठी सोडाच (बरेच लोक ८-१० वर्षं तरी पुण्यात राहात होते, काहीतर जन्मापासून.) हिंदीमधूनसुद्धा बोलला असेल तर शप्पथ ! तिथे सौरव गांगुलीचा चाललेला जयघोष (इथे पण 'घोष' आलाच!), चॅपेल ची निंदा वगैरे मला माझी मैत्रीण भाषांतरित करून सांगत होती.
सांगायची गोष्ट, आपण मराठी / महाराष्ट्रीय (महाराष्ट्रीयन नाही !) म्हणून आपली अशी ओळख जपावी म्हणून काय करतो असं तेव्हा मला वाटलं. म्हणून हा चर्चाप्रपंच. आता माझं मनोगतावरचं नावच फ़िरंगी...तेव्हा मराठीबद्दल आपुलकीनी / कळकळीनी लिहिण्याचा मला अधिकार नाही हे म्या पामराला कसं समजावं ? चायला...उद्या चित्तोपंतांना 'भट' असून उर्दू कसे लिहिता विचाराल !
जाऊदे ! मला काय म्हणायचंय ते बहुधा सगळ्यांच्या लक्षात आलं आहेच ! माझं असं, भाबडं म्हणा हवं तर, स्वप्न आहे की निदान आमच्या पोरांनी एकदा तरी आम्हाला "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा - काय लिहिलंय माडगूळकरांनी" असं कौतुकानं सांगावं. बस !