प्रियालीताई,
अनुभवकथन छान. यातून तुम्ही गेल्या वर्षीच्या काही कडूगोड आठवणी ज़ाग्या केल्यात.
गेल्या वर्षी आज़च्याच दिवशी (२६ जुलै) आमचा अभियांत्रिकीच्या शेवटच्या सत्राचा निकाल लागला आणि मी व आणखीही बरेच ज़ण अभियंते झालो. महाविद्यालयात निकाल आणण्यासाठी गेलो, तेव्हा दुपारपासून असे काही होईल याची नाममात्र कल्पनाही आली नाही. दुपारनंतर महाविद्यालयातच अडकून पडलेले आम्ही काही ज़ण घरी येण्याचे धाडस करून बाहेर पडलो; पण छातीभर पाण्यातून चालत रेल्वे स्थानकापर्यंत ज़ाणेही शक्य नसल्याने शेवटी ज़वळच्याच एका मित्राच्या घरी गेलो. रात्रभर वीज़ नाही. अंधारातच कशीबशी रात्र काढली. मित्राचे बाबा जिकडे काम करतात, तिथून घरी यायला त्यांना साधारण वीस मिनिटे लागतात. त्या दिवशी मात्र साडेपाच तास लागले. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कार्यालयात अडकून पडलेले आणखी चार ज़ण आल्याने मित्राच्या आईची भलतीच पंचाईत झाली होती.
या सगळ्या धबडग्यात अभियंते झाल्याचा आनंद साज़रा करण्यासाठी आखलेले बाहेर जेवण्याचे नि फिरण्याचे बेत धुळीला मिळाले (की पाण्यात बुडाले?!) दुसऱ्या दिवशी घरी पोचल्यावर न भूतो न भविष्यती अशा या दिवसात प्रत्ययास आलेल्या "मुंबई स्पिरीट" बद्दल ऐकायला वाचायला मिळाले. असो.
जिवंत अनुभवचित्रणाबद्दल अभिनंदन.