मागच्या २६ जुलैची ही आठवण खरीच भयावह.
त्या दिवशी दुपारची ड्युटी असल्याने आम्हाला सात वाजेपर्यंत बाहेर काय चाललंय याचा पत्ताच नव्हता. नंतर पाणी भरू लागलंय इ. कळलं, पण मुंबईतील नेहमीचीच गोष्ट म्हणून सोडून दिलं. इमर्जन्सी वॉर्डातून सर्पदंशाच्या पेशंटचा कॉल आला म्हणून बघायला गेले आणि चक्क हादरलेच. त्या बाईला सर्पदंश कुठे गावात नव्हे तर किंगसर्कल स्टेशनला झाला होता. गाड्या अडल्यामुळे मैत्रिणीच्या मदतीने चालत घरी जाऊ पाहणाऱ्या त्या बाईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ आली होती. नंतर कळलं पाणी साचल्याने रस्त्यावर साप वैगेरे दिसतायत.
चारपाच दिवसांनी या घाण पाण्यातून चालल्यामुळे साथीचे आजार पसरून कित्येक रुग्ण लेप्टो, मलेरिया आजारांनी भरती होऊ लागले. हॉस्पिटलचे वॉर्ड भरून गेले , दिवसरात्र अथक काम होतं पुढचे किमान पंधरा दिवस! यातले खूप अत्यवस्थ रुग्ण इतरांना मदत करण्यासाठी रात्रभर पाण्यात उभे होते. इतरांना मदत करताना त्यांच्या स्वतःच्या प्राणावर बेतलं होतं. असा एखादा रुग्ण गमावल्यावर एक रुग्ण गमावला याचबरोबर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांना मदत करणारा एक भला माणूस गमावला याचंही दुःख होत असे.
साती काळे.