आमच्या घरी रविवारी आई कपाट आवरायला घेते. लग्नाआधी माझे कपाट तिने नुसते उघडले तरी मी तिथे लगेच हजर होऊन तिला मी नंतर आवरीन तू नको आवरुस असं सांगत असे. माझ्या अश्या बोलण्यामुळे नंतर नंतर तर आईला जरा संशयच यायला लागला. त्यामुळे तीच माझे कपाट आवरायची. पण तिथे मी पूर्ण वेळ हजर.
आई कपाटात मागे पडलेले काही ड्रेसेस बघून हे का घालत नाहीस म्हणून ओरडायची. सध्या तो ड्रेस होत नाहीये पण मी जरा बारीक झाल्यावर घालणार आहे असं सांगितल्यावर छद्मी हसून त्यापेक्षा देउन टाक, कोणीतरी वापरेल असं सांगायची. पण मला ड्रेसचा मोह आणी मी बारीक होईन हा (फाजील) आत्मविश्वास असल्याने ड्रेस देववत नसे. आता मात्र नाईलाजाने जुने (यापुढे कधीच) न होणारे ड्रेसेस देऊन टाकते.