अध्यात्मामध्ये प्रगत अशा अनेक सत्पुरुषांच्या चरित्रांमध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या लिखाणामध्ये बऱ्याच अद्भूत गोष्टींचे दाखले मिळतात. सर्वविद्वतजनमान्य अशा आणि जे स्वतः अतिशय पुरोगामी विचारांचे विचारवंत होते अशा लोकांच्या चरित्रातही असे दाखले पाहून मात्र, अद्भूत घटना घडतच नाहीत असे कसे म्हणावे ? हे मला कळेनासे होते.
यात न कळण्यासारखे काहीच नाही. अहो ही माणसे मोठी असली तरी त्यांच्या अनुयायांमध्ये बहुसंख्य सामान्य माणसे असतात. बहुतेक कमकुवत मनाच्या माणसांना नमस्काराला एक बुवा हवा असतो. जरा शिकले सवरले तर असा एखादा पुरोगामी बुवा शोधून काढतात वा चुकून एखाद्या गंडेदोरेवाल्याकडे न जाता इकडे पोचतात. अशा माणसांना आपल्या बुवाने चमत्कार केलेला नाही त्यामुळे इतर 'पॉवरफ़ुल' चमत्कारी बाबांसमोर त्यांचा कमीपणा दिसतो असे वाटते. म्हणून ते अशा चमत्कारांच्या कथा रचतात (बहुधा त्या व्यक्तिच्या निधनानंतर) आणि प्रसृत करतात. त्यामुळे त्याबाबाकडे आणख़ी काही बुवा शोधणारी मंडळी येतात आणि मठाची भरभराट होते.
मदर तेरेसा यांना संतपद देण्यात 'त्यानी चमत्कार केलेला नाही' एवढी एकच गोष्ट आड येत होती. कॅथॉलिक परंपरा चमत्काराला मानते त्यामुळे ते आवश्यक असते. सुदैवाने चर्चने नंतर अपवाद करून त्यांना संतपद दिले. अन्यथा अनेक व्यक्तींचे आयुष्य उजळणाऱ्या, मानवतेच्या महान सेविकेला संतपदापासून वंचित ठेवले असते. कदाचित काही अनुयायांनी असे खोटे किस्से लिहून ती गरजही पूर्ण केली असती. मग आपण त्यांच्या कार्याऐवजी त्यांच्या चमत्कारांवरून त्यांची ओळख करून दिली असती. (संतपद मिळणे न मिळणे महत्वाचे नाही हे खरे पण त्यामुळे चमत्कारांचे प्रत्यक्ष कार्यापेक्षा महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असते).
-विचक्षण