इकडे सगळे बुवा-बाबांचे विरोधक दिसताहेत. त्यांचे डोळे उघडावेत म्हणून आमच्या बाबांच्या दोन 'सत्य'-कथा येथे देत आहे. आमचे एक प्रसिद्ध बाबा आहेत, त्यांची हवेतून चेन/अंगठी वगैरे काढण्याबद्दल ख्याती आहे. अनेक राजकारणी त्यांचे भक्त आहेत. त्यांचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही त्या 'अंनिस' वाल्यांसारखे त्यांना त्रास द्याल. या दोन कथा तुम्हा लोकांचे डोळे उघडावेत म्हणून.
एकदा पी. सी. सरकार बाबांना भेटायला आले. पण त्यांनी आपली पूर्ण ओळख सांगीतली नाही (बाबांना फसवले). गोरागोमटा श्रीमंत बंगालीबाबू पाहून बाबांना अनुग्रह करण्याची इच्छा झाली. त्यांनी हवेतून एक रुद्राक्ष काढून सरकारांच्या हातावर ठेवले. या अनुग्रहाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे सोडाच पण सरकारांनी त्या हाताची मूठ मिटून उघडली आणि त्यातून एक रसगुल्ला काढून बाबांना दिला. बाबांनी अर्थातच अशा माणसाला धक्के मारून आश्रमाबाहेर काढले. बाबांची नक्कल करतो म्हणजे काय.
दुसऱ्या एका प्रसंगी काही भौतिकशास्त्राचे (की पदार्थविज्ञानाचे हो) काही प्राध्यापक बाबांना भेटायला आले होते. बाबांनी हवेतून एक अंगठी काढून टेबलावर ठेवली आणि सर्व प्रा. लोकांकडे पाहिले. जणू विचारले की सांगा तुमचे शास्त्र काय म्हणते. त्याचे उत्तर देण्याऐवजी एका चावट प्रा. ने बाबांनाच विचारले, म्हणे ज्या विद्येने तुम्ही ही अंगठी हवेतून काढली, त्याच विद्येने ती अंगठी (हात न लावता) टेबलावर सरकवून दाखवता का. काय हा उद्धटपणा. बाबा अर्थातच अशा मूढांशी बोलण्यात अर्थ नाही म्हणून टेबलाला लाथ मारून चालते झाले.
तसेच तुमचे ते 'अंनिस' वाले काहीतरी फिल्म दाखवतात. त्यात म्हणे बाबांना कपड्यात लपविलेली चेन काढताना 'रक्तहस्त' (म्हणजे red-handed हो) पकडले आहे म्हणे. हा सगळा अपप्रचार आहे. आम्ही भक्त मंडळी त्याकडे बिलकुल लक्ष देत नाही.
आणि या दोन्ही खरच 'सत्य'-कथा आहेत. खोटे वाटत असेल तर त्या 'अंनिस'-वाल्या दाभोळकरांचे 'ऐसे कैसे झाले भोंदू' वाचा. त्यांनाही मान्य कराव्या लागल्या आहेत.
- (बाबाभक्त) विचक्षण