माझी कंपूबाजीची व्याख्या
- केवळ आपल्या कंपूतील लोकांविषयी चांगले लिहिणे.
- केवळ आपल्या कंपूतील लोकांना प्रतिसाद देणे
- नावडत्या व्यक्तीला कंपूतील सगळ्यांनी मिळून _ठरवून_ वाईट प्रतिसाद देणे.

१. मनोगतावर कंपूबाजी आहे असे आपल्याला वाटते काय?

तर वर लिहिलेली कंपूबाजी मनोगतावर फारशी नाही असे मला वाटते. तशी दिसणारी काही वागणूक काही वेळा काही सदस्यांच्या वाट्याला येते हे मी पाहिले आहे. पण तो नियम नव्हे. (exception rather than norm)

२. आपण स्वतः कोणा कंपूत सहभागी आहात काय?

नाही असे मला वाटते.

बारश्याच्या आधीच्या बाळमनोगतापासून ते आत्तापर्यंत मी मनोगताशी संलग्न आहे. सदस्य नवीन येतात तेव्हा त्यांना जुने लोक एकमेकांना ओळखतात असे वाटते, त्यातून कंपूबाजीची शंका निर्माण होते, त्यातून मग आपणही कुठल्यातरी गटात असावेसे वाटू लागते. असे होत होत थोड्या काळासाठी काही छोटे कंपू बनतात पण जसजसे सदस्य 'जुने' होत जातात ते विरघळतात. मी मनोगतावर आले तेव्हा मुळात सदस्यसंख्या दोन आकडी होती. त्यामुळे जुने असे कोणीच नव्हते. त्यामुळे मला या चक्रातून जावे लागले नाही असे वाटते.

मध्यंतरी प्रवासीपंत प्रत्येक नव्या सदस्याचे स्वागत करीत असत. त्यामुळे 'नव्यांना' लगेच आपण गटात असल्यासारखे वाटून मनोगताचे 'एक मोठा कंपू' असे रूप कायम राही. तसे करणेही आता वेगाने वाढणाऱ्या मनोगतावर शक्य नाही. अदितीने म्हटल्याप्रमाणे नाव वाचून साहित्य वाचणारे लोक असायचेच. त्यामुळे कंपूबाजीचा भास होणे साहजिक आहे. या बाबतीत सातीचे उदाहरण देता येईल. त्यांच्या लेखनाची वाचने व प्रतिसाद सावकाश वाढत गेली. सुरुवातीला त्यांनाही 'हे कुणी वाचतंय की नाही' अशी शंका येऊन गेली.

माझ्या वरच्या ओळीत मी सदस्यांची नावे घेऊन काही संदर्भ दिल्याने असे वाटते की मी त्यांना ओळखते, कोणाला अहो म्हणायचे कोणाला अगं हे मला माहित आहे. त्यातून 'नव्यांना' असे वाटू शकते की आपले इथे कसे होणार, काही संदर्भ माहित नाहीत, मधे बोललो तर लोक आपली टिंगल तर करणार नाहीत, हसणार तर नाहीत. वगैरे. यातून वाचून जे 'नवे' काही लिहितात, त्यांना प्रतिसाद मिळेलच असे नाही. मग 'यांच्या टुकार लेखनाला इतके प्रतिसाद आणि मला काहीच नाही' असा हिरमोड होतो. मग जिथे तिथे कंपूबाजी दिसू लागते. तात्पर्य: मनोगतावर कंपूबाजी असलीच तर ती सदस्यसापेक्ष आहे असे मला वाटते. ;-)