नियम म्हणून ठीक आहे पण मला कधीकधी प्रश्न पडतो की ही पद्धतच का पडली असावी? मला शिकवताना पूर्वी जर गांव, नांव , पांच  असे शिकवले गेलेय तर त्यामागेही कोणते तरी कारण असेलच ना. काही ठराविक शब्दच असे लिहिले जातात त्यामागे काय कारण असावे?

गाव = ग्रा, नाव = ना, पाच = पञ्अशी त्या शब्दांची व्युत्पत्ती लक्षात घेता, त्या मराठी शब्दांमधील मूळच्या अनुस्वाराचे प्रयोजन कळावे. माझ्या माहितीप्रमाणे तसेही हे शब्द मराठीतही एकेकाळी सानुनासिकच उच्चारले जात असावेत, पण नंतर (काही भाग वगळता) त्यातला अनुनासिक उच्चार लोप पावला असावा, आणि म्हणून शुद्धलेखनाचे नवीन नियम बनवताना हे अनुच्चारित अनुस्वार वगळावेत असे ठरवले गेले असावे.

(बाकी अजूनही काही ठिकाणी शाळेत अनुच्चारित [?] अनुस्वार शिकवले जातात ही नवीनच माहिती कळली. अर्थात त्यात काही चूक आहे असे म्हणण्याचे प्रयोजन नाही - विशेषतः जिथे ते अनुच्चारित नाहीत तिथे ते मुद्दाम वगळणे पटतही नाही - केवळ मी शाळेत असताना [पंचवीसतीस वर्षांपूर्वी] हे शब्द [नवीन पद्धतीने]अनुस्वाराविनाच शिकवले गेले, आणि आजोबांची पत्रे वगैरे वाचली नसती, तर हे शब्द एकेकाळी अनुस्वारांसहही लिहिले जात, हेही कदाचित कळले नसते, एवढेच मांडण्याचा उद्देश आहे.)

वरील परिच्छेदात 'अनुच्चारित'नंतरच्या चौकटीकंसातील प्रश्नचिन्हाचे प्रयोजन 'या शब्दांतील अनुस्वार हे सर्वत्र अनुच्चारित नसावेत' हे मांडणे एवढेच आहे.

माझ्या गांवाचे नांव गांवातील सर्व लोक शिरगांव असं लिहितात आणि इंग्रजी स्पेलिंगही shiragaon असं करतात यामागे काय कारण असावे?

हेच. (आणि कदाचित काही अंशी परंपरा म्हणून. त्यात काही चूक आहे असे मला व्यक्तिशः वाटत नाही.)

(उच्चार कसा होतो?)

फार काय, मुंबईतल्या गिरगावाचे इंग्रजी स्पेलिंगही Girgaon (किंवा Girgaumसुद्धा) केले जाते. Goregaon, Talegaon, Lohagaon (किंवा Lohegaon) अशीच स्पेलिंगे अजूनही प्रचलित आहेत.

कोंकणातील लोक (की कोंकणस्थ)सानुनासिक उच्चार करतात म्हणून केवळ असं लिहायची पद्धत पडलीय का?

नाही. माझ्या कल्पनेप्रमाणे हे शब्द मुळात सानुनासिकच उच्चारले जात असावेत; फक्त कोंकणात / कोंकणस्थांत ही पद्धत अजूनही चालू आहे.

आणि एखाद्याला (कोणत्याही कारणासाठी- जसे मला परंपरा म्हणून)असेच लिहायचे असेल तर माझे शुद्धलेखनाचे गुण कमी करणार का?

मी परीक्षक असलो तर करणार नाही. (मात्र त्यात consistency असावी.) इतरांचे सांगता येत नाही. (पण मला विचारतो कोण?)

हे थोडेसे British spelling vs. American spelling सारखे आहे, असे मला तरी वाटते.

मराठी शुद्धलेखनाच्या प्रचलित नियमांप्रमाणे "ल" हे अक्षर या पद्धतीने लिहिणे चुकीचे आहे असे वाचले होते. पण एखाद्याला तो दांडीवाला "ल" लिहायचा नसेल तर?

"ल" हे अक्षर या पद्धतीने लिहिणे चुकीचे आहे हे मला नवीन आहे. तसे जर खरोखरच असेल, तर हिंदीचे मराठीवरील आक्रमण म्हणून मी त्याचा निषेध करतो, आणि (एरवी तो दांडीवाला "ल" लिहायची सवय असली तरी) आजपासून शक्यतो आपला मराठमोळा "चुकीचा"च "ल" लिहिण्याचा प्रयत्न करतो. (तसेही आजकाल मराठीतून [हाताने] लिहिण्याची फारशी वेळ येत नाही म्हणा! [इंग्रजीततरी कितीशी येते?])

अवांतर:

'अनुच्चारित अनुस्वार हे अनुच्चारित असले तरीही लिहिले जाणेच योग्य असावे' असाही एक प्रतिवाद (योग्य कारणासह आणि फार छान उदाहरणासह) एकदा वाचनात आला होता. (स्रोत नक्की आठवत नाही, पण बहुधा कुठलीतरी 'वाचकांची पत्रे'...) कारणमीमांसा थोडीशी अशी, की अनुच्चारित अनुस्वार लिहिल्याने बऱ्याचदा अभिप्रेत अर्थच्छटा (की अर्थछटा?) स्पष्ट होऊ शकतात. जसे 'कुत्री झोपली होती' आणि 'कुत्रीं झोपलीं होतीं' या दोन वाक्यांचे अर्थ भिन्न आहेत. पहिल्या वाक्यातील 'कुत्री' ही स्त्रीलिंगी एकवचनी आहे, तर दुसऱ्या वाक्यातील 'कुत्रीं' ही नपुंसकलिंगी अनेकवचनी आहेत. ('कुत्रे' [नपुं.] किंवा उच्चारी 'कुत्रं' चे अनेकवचन.) अनुस्वार वगळल्यास दोन्ही वाक्ये सारखी होतात, आणि नेमका अर्थ संदर्भाशिवाय स्पष्ट होत नाही.

- टग्या.