एखाद्या बातमीसंबंधी लेखन करताना कृपया मूळ बातमीचा दुवा द्यावा आणि/किंवा त्या बातमीचा आशय सांगावा.
===
बातमी
सकाळ
२७ जुलै २००६
पंतप्रधानांच्या निवासस्थानी तिघा तरुणांची घुसखोरी
नवी दिल्ली, ता. २७ - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी आज रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना तिघा तरुणांनी घुसखोरी केली. या तिघांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. ....
..... काळ्या रंगाच्या अलिशान मोटारीतून आलेल्या विशीतील दोघी तरुणी व एका तरुणाने रात्री नऊच्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानात सहज प्रवेश मिळविला. मंत्री आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ज्या शेवटच्या दारातून आत सोडले जाते तेथपर्यंत हे तिघे मोटारीतून गेले. तेथे ही मोटार पाहून विशेष सुरक्षा दलाचे जवान आश्चर्यचकित झाले. त्यांनी ही मोटार अडविली आणि त्यांची चौकशी केली.
""आम्ही सर्वसामान्य नागरिक असून, पंतप्रधानांना भेटण्यासाठी आलो आहोत,'' असे एका तरुणीने सांगितले. ""पंतप्रधानांनी आपल्याला भेटीसाठी वेळ दिली आहे का,'' या प्रश्नावर तिने "नाही,' असे उत्तर दिले. त्यावर, ""अशी वेळ दिली नसल्याने तुम्हाला पंतप्रधानांना आत्ता भेटता येणार नाही,'' असे त्यांना सांगण्यात आले. पाचच मिनिटांत ही चौकशी संपली आणि हे तिघे आले तसे निघूनही गेले.
त्यानंतर उपस्थित जवानांना हा प्रकार काहीसा गंभीर वाटल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी या तिघांना दक्षिण दिल्लीत तातडीने ताब्यात घेतले. हे तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी चौकशीदरम्यान त्यांनी काही चाळेही केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यास दुजोरा मिळू शकला नव्हता. पोलिस या तिघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करीत होते.
यातील एक तरुणी जयपूरची असून, तिचे नाव योग्यता असे आहे, तर अन्य दोघांची नावे इमरान व बीना, अशी आहेत. एका खासगी विमान कंपनीत आपण "एअर होस्टेस' म्हणून काम करीत असल्याचे योग्यता व बीनाने सांगितले. ""पंतप्रधानांना भेटता येणे शक्य आहे का, हे आम्हाला पाहायचे होते. आम्ही त्यानुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेलो. तेथे आम्हाला ज्या सहजतेने प्रवेश मिळाला, ते पाहून आम्हीही काहीसे आश्चर्यचकित झालो,'' असे योग्यताने सांगितले. आपण पंतप्रधानांचे नातेवाईक असल्याचे सांगून योग्यताने पंतप्रधानांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, असे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.
"ही घुसखोरी नव्हे'
पंतप्रधानांच्या निवासस्थानी या तिघा तरुणांनी घुसखोरी केली नसल्याचे पंतप्रधानांच्या कार्यालयातील प्रवक्ते संजय बारू यांनी सांगितले. ""पंतप्रधानांच्या निवासस्थानातील रिसेप्शन कक्षापर्यंत सर्वसामान्य नागरिक येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षेचा भंग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भेटीची वेळ दिली नसल्यास नागरिक तेथूनच परत फिरतात,'' असे श्री. बारू यांनी सांगितले.