गणपती सारख्या सार्वजनिक उपक्रमात आपण सहभागी व्हावे. आपल्या चार-पाच समविचारी दोस्तांना घेऊन सहभागी व्हावे. मंडळाचे सभासद व्हावे. गणपतीचे कार्यक्रम ठरवण्यासाठी आणि त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. म्हणजे वर्गणीचा योग्य वापर होतो की नाही यावर नियंत्रण ठेवता येईल. दारू/ नाचगाणे यासारख्या गोष्टींवर त्या पैशांचा अपव्यय होणार नाही.
एक गाव एक गणपतीः अनेक ठिकाणी (कुठेकुठे सरकारी पुढाकाराने) एक गाव एक गणपती सारख्या योजना सुरू झाल्या आहेत. आपण शहरात राहणारे असू तर 'एक गल्ली एक गणपती' सारख्या योजना सुरू कराव्या, त्यासाठी 'सुजाण नागरिकांचे'  दबावगट स्थापन करावे. म्हणजे दहा मंडळांना देणगी देण्याचे काम पडणार नाही. 

दिडशे वर्षांपूर्वी असा उपक्रम सुरू करण्यापूर्वी टिळकांचा हेतू काय असेल बरे असा विचार करावा. मी त्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी काय योगदान देऊ शकतो असे पाहावे.

हे करावयचे नसेल (वेळ नाही या सबबीखाली) तर इतर चर्चा, हेवेदावे, टीका, शिव्या देणे वगैरे करत राहावे. (तर हे सर्व सार्वजनिक उत्सवांच्या वर्गणी विषयी. )