तुषार,
हा अनुवाद जमला नाही असे मला वाटते. हे तर अगदी शब्दशः भाषांतर वाटते आहे.
माफ करा खूपच कठोर भाषा वापरली आहे, पण मला आपले इतर लेखन आवडले आणि त्या मानाने हा अनुवाद खूपच ठेंगणा वाटला, म्हणून लिहिले. कृपया राग मानू नये.
आपला चाहता,
शशांक उपाध्ये
शशांक उपाध्ये आणि अन्य सगळे (५३ वाचने मध्ये येणारे) वाचक जन हो,
शांतपणे विचार केल्यावर, काही दिवस थांबून या कवितेबद्दलचे माझे विचार ईथे मांडतोय. सर्वप्रथम शशांक यांनी प्रांजळपणे प्रतिसाद दिला आणि आपल्या मनातली बात सांगितली म्हणून त्यांचे आभार मानतो. त्यामुळे या कवितेवर अधिक विचार करण्याची मला प्रेरणा व संधी मिळाली.
ग्रेस ने मितवा मध्ये या ओळींचा संदर्भ दिल्यापासून आणि माझ्या वाचनात आल्यापासून या ओळी मला छळतात. लाकूडतोड्याला विनंती आहे, ए लाकूडतोड्या! तू माझा अंत कर. लाकूडतोड्या म्हटल्याने ही झाडाची विनंती आहे हे लक्षात येते. ग्रेस ने फक्त चारच ओळी उधृत केल्या आहेत त्यात त्या कवितेचे नाव नाही त्यामुळे "निःफळ संत्र्याच्या झाडाचे गाणे" हे कवितेचे नाव आणि अर्थातच संदर्भ त्यात त्यांनी दिला नाही. तरीही लाकूडतोड्या या शब्दाने हे झाडाचे म्हणणे आहे हे जाणवते.
लाकूडतोड्या इथे खऱ्या अर्थाने तो व्यक्ती ठरतो ज्याच्याजवळ झाडाचा अंत करण्याचे बल आहे, साधन आहे. एक प्रकारे तो ही मागणी पूर्ण करू शकतो असा आहे. लाकूडतोड्या हा शब्द काढून टाकणे शक्य नव्हते. लाकूडतोड्या या कवितेचा शंभू आहे.
"माझी सावली काप" ही कल्पनेची अफाट भरारी आहे. सावली कापणे म्हणजे सावली आता पडूच नये अशी स्थिती आणणे. मला मार किंवा तोड न म्हणता कवीने काय सुंदर शब्दयोजना केली आहे. "ओ वुडकटर, कट माय शाडो" या शब्दांनीच तर ही कविता खरी लक्षात राहते. मग माझी सावली काप हे शब्द न योजणे म्हणजे कवितेचा प्राण काढून टाकणे होईल.
हे फळहीन जगणे एक अखंड वेदना आहे. एक शाप आहे आणि असे जगणे यापेक्षा मरणे कितीतरी चांगले असा काहीसा भाव या ओळींमधून समजतो. माझ्या दृष्टीने प्रतिभावंताची जेव्हा सर्जनशून्य वेळ असते तेंव्हा त्यालाही ते जगणे नकोसे होत असते. बरेच प्रतिभावंत त्याला "बॅड पॅच" म्हणतात. तेंव्हा एक प्रकारचे वांझोटे जगणे आपल्या वाट्याला आल्यासारखे वाटते. ही खूप पीडादायक अवस्था असते.
माझे त्या इंग्रजी शब्दांच्या प्रेमात पडणेच कदाचित त्यांचे शब्दशः भाषांतर होण्यात कारणीभूत आहेत असे वाटते.
आपण वेगळे आहोत याची जाणीव आपल्याला काही बाबतीत आनंद देत असते. सगळ्यांसारखे रटाळ आयुष्य जगणे "मोनोटोनस" जगणे नकोसे असते. स्पॅनिश भाषेत कदाचित कोणतातरी वाक्प्रचार असा असावा. कवीने योजलेले शब्द आहेत माझ्या भोवती सगळे आरसे दिसतात. मला माझेच प्रतिबिंब सगळीकडे दिसतेय आणि ते नकोसे झालेय. त्याच्या याच शब्दांचा मला कोणीतरी अधिक विस्तृत अर्थ सांगेल असे मला वाटले होते. तसे मी भाषांतराच्या वर जो उतारा लिहिलाय त्यातही म्हटले होते. पण अजून कुणाला ते लिहिण्याचा वेळ झालेला नसावा किंवा या कवितेत माझ्याइतकी आस्था असलेली व्यक्ती अजून वाचकांमध्ये नसावी. मी वाट पाहीन.
भाषांतराच्या निमित्ताने मी या कवितेवर असलेले माझे प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न केलाय. मला मान्य आहे की तो नेहमी चांगलाच होतो असा नाही. मग मी तो इथे का प्रकाशीत केलाय? त्याचे कारण म्हणजे माझी एक समजूत आहे की समविचारी लोक जेव्हा ते वाचतील तेंव्हा त्यांना पण त्यावर लिहिण्याची इच्छा होईल, नवे जोडायची इच्छा होईल आणि त्यांच्याबरोबर माझीही ज्ञान वृद्धी होईल.
५३ वाचकांपैकी सर्व वाचकांचे मी आभार मानतो की त्यांनी या कवितेवर वेळ दिला व शशांक उपाध्येंचे पुन्हा आभार मानतो कारण त्यांच्याच प्रतिसादावर मला अजून या कवितेबद्दल लिहिण्याची प्रेरणा झाली आणि पुन्हा एकदा या कवितेचा एक नवा आस्वाद घेता आला.
(नवोदित)
तुषार