सावरकर जन्मशताब्दीच्या वेळेस एक दैनंदीनी प्रकाशित झाली होती.  कुणी केली ते आठवत नाही पण त्यात बरीच माहीती होती. त्यात शंकर वैद्यांची सावरकरांचे भाषण ऐकल्यावर स्फुरलेली एक कविता होती. ती तेंव्हा आवडल्यामुळे पाठ करून ठेवली होती. आता ती दैनंदीनी जवळ नाही पण डोक्यात असलेली शंकर वैद्यांची ही कविता खाली लिहीत आहे. शिर्षक आठवत नाहीः (व्याकरणासहीत चु.भू.द्या. घ्या.!)

लाखांचा समुदाय लोटला घुमवित कोलाहल

त्या नादाने वरी सरकले गगनांचे मंडल

व्यासपिठावर परंतू होता दिव्य तुझी चाहूल

श्वास रोखूनी ख़िळून बसले अवघे भूमितल

शब्द तुझा अन पहीला जेंव्हा कानावर पडला

रोमांचाचा शेला अंगावरती फडफडला ॥

नयनांच्या जाळ्यात ठेविले जरी तुला पकडून

शब्दांच्या जाळ्यात चालले अडकत सारे जन

तव वदनातून फुटू लागल्या हस्तामधल्या सरी

लखलखली अन तल्लख जिभली चलाख बिजली परी

नभ फोडून नग लंघित गंगा ओघ जणू आला

रोमांचाचा शेला अंगावरती फडफडला ॥

शकले पडता भारतभूने जी किंकाळी दिली

तव ह्रदयातील कोटरात ती दडूनीया बैसली

पंख उभारून आक्रंदून ती येताना बाहेर

लाख विजा गगनात लोटल्या कोसळले अंबर

हाय भारतभू हाय हुंदका हेलावत गेला

रोमांचाचा शेला अंगावरती फडफडला ॥

तू सिंधूचे स्तोत्र गाईले गहिवरूनी अंतरी

वात्सल्याचा तवंग फिरला जनसंमर्दावरी

स्वातंत्र्याचे गान नाचता वदनी ओसंडून

अदभूत शक्ति लहरत गेली अंगाअंगातून

छेडीलेस तू ह्रदयामधल्या जणू प्रत्यंचेला

रोमांचाचा शेला अंगावरती फडफडला ॥