या सामूहिक बागेच्या निमित्तानं परदेशाच्या मातीत सुद्धा बागकामाचं बीज रुजलं... मातीशी नात जुळलं... याचं थोडं समाधान वाटतं. देश कोणताही असो, माती सगळीकडे सारखीच. बी पेरलं की रोपटं उगवणारच.
हे वाक्य खूप आवडलं. लेख तर अप्रतिमच लिहिला आहात. कित्येक आठवणींना उजाळा मिळाला या लेखामुळे. असे लेख येऊ द्या अजून.
आऊकडे घरासमोर मस्त अंगण आणि त्यात वड, पिंपळ आणि उंबर यांची त्रिपेडी वेणी आहे. त्याच्या अवतीभवती मस्त कट्टा केलेला जो रोज शेणाने सारवायचं काम असायचं. दुपारी कडक ऊन पडलं की या झाडांच्या थंडगार सावलीत खाट टाकून आऊ, तिच्या मैत्रिणी गप्पा मारायला बसायच्या आणि त्यांच्या आजूबाजूला आमचा लहानांचा कट्टा सजायचा. अंगणातल्या करडीच्या झाडांच्या बिया गोळा करून मी आणि माझ्या चुलतबहिणी विद्या आणि प्राजक्ता टोपल्यांमधून त्या विकायला दुकानात घेऊन जायचो. वाढवायला आणलेल्या नारळाला सोलल्यावर त्याला कोंब फुटलेला आहे हे बघताच माझा आकांडतांडव झाला होता की तो फोडायचा नाही म्हणून. आऊ आणि आईने मग तो अंगणात पेरला होता. त्याची वाढ होताना पाहून इतका आनंद व्हायचा की विचारता सोय नाही. पारिजातक, चिनी गुलाब, जास्वंद वगैरे फुलझाडं तर होतीच पण निरनिराळ्या भाज्यांचे वाफे करून पालक, मेथी, चुका, कोथिंबीर, कांदा, बटाटा, गाजर, चवळी, मटार वगैरे अनेकानेक भाज्याही व्हायच्या आऊच्या बागेत. बोराची जाळी सुद्धा होती खास माझ्यासाठी लावलेली. लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा या आमच्या गाईंचं आणि लहानग्या चंद्रू गोऱ्ह्याचं जेवणदेखिल या बागेतूनच निघायचं बरचसं, नेहमीचा कडबा तर असायचाच. झोक्यासाठीही वणवण हिंडायची गरज पडायची नाही भरभक्कम त्रिपेडी वेणीमुळे. आऊकडे कुठलीच अत्याधुनिक सोय नसतानादेखील या साऱ्या नैसर्गिक सुखसोयींमुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्याकडे गेले की जबरदस्त चंगळ असायची.
( हे वर्णन २-३ वर्षांपुर्वीचं आहे. आता मात्र पाणी टंचाईमुळे माणसाजनावरांनाच प्यायला पाणी मिळत नाहीये तिथे झाडांची काय कथा ! त्रिपेडी वेणी सोडता आता बागेत काहीच उरलं नाही. भकास अंगण बघून जीवाची घालमेल होते. अंगणात विहीर खोदली, सुरूवातीला बऱ्यापैकी पाणीही लागलं होतं पण तेही बारमाही उपलब्ध असत नाही त्यामुळे बागेचे चोचले (?!!) बाळगणे शक्य नाही आता. आऊची तब्ब्येतही ठीक नसते म्हणा आता. गाईंना देखील सुक्या कडब्यावरच गुजराण करावी लागत आहे. )
आमच्या शहरातल्या घरी छोटीशी बाग आईने फुलवली आहे. भाज्या घेणे तर शक्य नाही पण शेवंती, कण्हेर, अनेकरंगी गुलाब, मोगरा वगैरे फुलझाडांनी नेहमी बहरलेली असते. कडीपत्ता, ओवा, तुळस वगैरे औषधी तर हाताशी असतातच बागेमुळे.
बागेशिवायच्या आयुष्याचा विचार करणे खूपच अवघड आहे आणि भाज्या, फुलझाडे वगैरेंना मरताना पाहणे तर जीव कासावीस करणारेच !