भारतातल्या सर्वच भाषांवर संस्कृतचे संस्कार आहेत पण तरीही त्यांचे स्वत:चे असे विशिष्ट अस्तित्व आहे. कोणत्याही जीवंत अर्थात नेहमी बोलल्याजाणार्‍या भाषेत वृद्धी ही होतच असते. जे शब्द एखाद्या भाषेत आधी नव्हते परंतु कालौघाप्रमाणे त्यांची आवश्यकता भाषा वापरणार्‍यांना भासली त्याप्रमाणे तसे शब्द प्रत्येक भाषेने स्वीकारले. यातही एक मोठा भाग असा आहे की जी भाषा सत्ताधारी किंवा ज्यांचा पगडा जनमानसावर फार होता असे लोकं वापरत असत ती भाषा अद्यापही रुळलेली व वापरात आहे. कारण तीचा वापर करणे हे समाजात इभ्रतीचं लक्षण मानलं जात असे. शिवाजी महाराज स्वत: आपल्या आईला ''माँसाहेब'' म्हणत असत असे आपण ऐतिहासिक पुस्तकात वाचलेले आहेच. शिवाय जे शब्द किंवा वस्तु नव्याच तयार झाल्या त्यांची नावे ज्या त्यांनी बनवल्या त्यांनी जशी ठेवली तशीच आपण वापरात घेतो. जसे की टेबल, रेल्वे इत्यादी आणि काही नावे जी उत्पादाची असतात आणि तशीच वापरली जाणे योग्य ठरते त्यांचीही भाषेत वृद्धी होतच असते. या बाबतीत ही तुझी भाषा ही माझी भाषा किंवा भाषेचे शुद्धीकरण असे करणे योग्य ठरणार नाही. आपली भाषा अद्याप बोलली व लिहिली जाते आहे, तिचा कस न बदलता तित इतर शब्दांची भर घालून ती अधिकाधिक वापरात कशी येईल याचा विचार करणे आवश्यक आहे..... प्रत्येकाने.