तात्यासाहेब, आपल्या रसना-रसिकतेची मी दाद देतो. आपल्या जरामरणालाही अजिबात न जुमानणाऱ्या बेदरकार वृत्तीचाही मला आदर वाटतो. किंबहुना मी स्वतःचेच थोडे वर्णनही वानगीदाखल करू इच्छितो.

अगदी २००४ सालच्या नोव्हेंबरापर्यंत, मी सायसाखर मोठ्या थाटात खात असे, खमंग चकलीवर ताज्या लोण्याचा गोळा ठेवून भरपूर चकल्या हादडत असे.

मात्र ह्या साऱ्यांचा माझ्या आरोग्यावर काय परिणाम होत आहे ह्याबद्दल मी पूर्णतः अनभिज्ञ होतो. आणि ज्याला मी आयुष्य जगणे समजत असे ते मनःपूत जगत होतो. जेव्हा माझा रक्तदाब प्रमाणाबाहेर गेल्याने ऍन्जिओप्लास्टीचा सल्ला दिल्या गेला तेव्हाही डॉक्टर लोकांचाच हा काहीतरी अनोखा कावा असावा, माझ्या धट्याकट्या प्रकृतीला अशी अचानक काय धाड भरणार, अशा प्रकारच्या स्वप्नरंजनात मी तल्लीन असे. नंतर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी माझ्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे शोधली तेव्हा अनोखीच तत्थ्ये सामोरा आली. त्यावेळी ज्या प्रश्नांची मजजवळ उत्तरे नव्हती त्यांची आज आहेत. तुम्ही रुची राखत असाल तर मी ती सर्व प्रश्नोत्तरे वाटून घेण्यास तयार आहे! राखता आहात का स्वारस्य?