काल हा जुना चर्चाप्रस्ताव वाचत होते. बरं वाटलं की वा! माझ्यासारखे बरेच आहेत. लहानपणापासून भयप्रद गोष्टी, सिरिअल्स, सिनेमा पाहायची आवड. काय करणार माणसाला स्वभावानुरुप गोष्टी आवडतात म्हणे. (आमच्या मातोश्री मात्र 'काय विकृत माणसं आहेत' असा उद्धार करत असतात. आमचा, आणि नारायण धारप, रत्नाकर मतकरी वगैरेंचा)
मध्यंतरी नारायण धारपांच्या लेखावरून त्यांच्या लुचाईची आठवण झाली. लहानपणी ही कादंबरी वाचली होती. लुचाई म्हणजे लुच्चेगिरी की काय अस वाटल होत, वाचल्यावर कळल की रक्त लुचण्यावर आहे. रात्री जाम भिती वाटायची. व्हॅम्पायर वर होती. त्यावरून अनुताईंनी ही कादंबरी स्टीफन किंगच्या "सेलम्स लॉट" वरून उचलल्याच सांगितल.
आमची प्रगती अशा विषयांत पुढे बरी झाली. म्हणजे आता रात्री एकटं बसून "द रींग", "द अदर्स" आरामात बघू शकतो. (कुठूनतरी दूरवरुन "विकृत विकृत" असा आवाज ऐकल्या सारखा वाटतोय)
असो. सध्या सेलम्स लॉट वाचते आहे. मॅट गुरुजी आणि बेन राव हॉस्पिटल मधे आहेत आणि गावांत नव-नविन लुचाई निर्मितीच कार्य अव्याहत सुरु आहे. हे असं वाचल्याने हल्ली मला झोप बरी लागते बुवा!
कालच रात्री स्वप्नात एक पार्टी सुरु होती आणि भर पार्टीत एक परात तरंगत प्रत्येकापाशी येत होती. खडबडून डोळे उघडले तर पलंगाबाजूचा टेबल लॅम्पही तरंगतोय की काय असं वाटून गेले. वा! एक वेगळीच तृप्ती अनुभवायला मिळाली आणि नंतर चांगली झोप लागली.
आता आपणच या विषयावर हात फिरवावा की काय असे प्रयत्न सुरु आहेत. कमकुवत हृदयाच्या माणसांनी तिच्या वाटेला न जाणे उत्तम. (पुन्हा कुठूनतरी दूरवरुन "विकृत विकृत" असा आवाज ऐकू येतोय असं वाटतय)
(उलट्या काळजाची) प्रियाली.
(सर्वांनी ह. घ्या., आमची कथा मात्र गंभीर घ्या)