का आमच्या शास्त्राला बदनाम करता? अहो वापरणाऱ्याला ज्ञान नसेल किंवा निष्कर्ष काय हवा हे आधीच ठरवून आकडेवारी जमवली तर बिचाऱ्या संख्याशास्त्राला काय दोष द्यावा.

एक मजेशीर उदाहरण सांगतो. वृत्तपत्राचे नाव Indian Express. एका रविवारच्या अंकात पहिल्या पानावर सर्वात खालील बातमी (जे सामन्यपणे खास feature असते) होती. एका वीराने संख्याशास्त्राच्या आधारे सिद्ध केले होते की सचिन तेंडुलकर हा भारताला जेंव्हा गरज असते तेंव्हा नेमका कामी येत नाही. (खरंतर ही ऑस्ट्रेलियन मिडियाची चलाखी भारतीय दौऱ्याच्या काळातील मीडिया वॉरचा भाग होती) मी सचिनचा पंखा असल्याने मुद्दाम बारकाईने वाचला आणि ह. ह. लो. पो.

साहेबांनी भारताला गरज असलेले म्हणजे भारत हरलेले सामने घेतले होते आणि त्यात सचिनची कामगिरी कशी वाईट आहे ते दाखवले होते. आता गंमत अशी की मी जर भारताने जिंकलेले सामने जमा केले तर नेमका उलटा निष्कर्ष काढून दाखवता येईल (तो कोण छापणार हो, मूर्तिभंजन अधिक खपते). साधे कारण आहे, सचिनच्या चांगले खेळण्या न खेळण्याचा मोठा प्रभाव निकालावर असेल तर हे अपेक्षितच नाही का? पुन्हा कार्यकारणभाव सिद्ध करण्यास याहून अधिक काही लागते.  नुसते दोन्हींचे एकाचवेळी अस्तित्व दाखवणे पुरेसे नसते. असे जो निष्कर्ष काढायची इच्छा आहे त्याला सोयीचा data घेऊन जर काम केले जाते आणि आमचे शास्त्र बापडे उगीच बदनाम होते. तसेच हल्लीचे नेट आणि sms सर्वे असेच असतात. असो.

तस्मात मी इथे असे जाहीत करतो की मनोगतावर संख्याशास्त्राबद्दल केले जाणारे लिखाण अगदी बारकाईने वाचले जाईल आणि चुकांचे (म्हणजे असल्या आणि मला सापडल्या तर) जाहीर वाभाडे काढले जातील. (ह. घ्या).

एक शेवटचा महत्वाचा मुद्दा. नुसते आकडे जमा करणे म्हणजे संख्याशास्त्राचा आधार मिळवणे नव्हे. आकडे जमा करण्यापूर्वी अभ्यासाचा उद्देश, व्याप्ती, त्यावर परिणाम करणारे वेगवेग़ळे घटक यांची माहिती असावी लागते, मगच 'संख्याशास्त्रीय प्रयोगाची रूपरेखा' तयार केली जाते. साधारणपणे असे म्हणत येईल की 'अंकगणित' हे जशी गणिताची पहिली पायरी आहे, तसे हे आकडेमोडीचे शास्त्र हे संख्याशास्त्राचे पहिले पाऊल आहे.  मुळात आधी आकडेवारी जमा करणे हे चूक आहे. अलिकडे 'डेटा मायनिंग' नावाचा जो प्रकार प्रसिद्ध होऊ लागला आहे त्यात असे चालते, परंतु बहुसंख्य संख्याशास्त्राचे अभ्यासक त्याला संख्याशास्त्राचा भाग मानत नाहीत.

असो.  मीराताई तुम्हाला बरेच संख्याशास्त्री माहीत आहेत. तुम्ही पण गणिती का?

-विचक्षण