भोमेकाका,
ते पुस्तक (खरे तर पुस्तके) पाहिल्याला आता ३० वर्षे होऊन गेली, जे आठवते ते सांगतो.
हा ग्रंथ हमखास मिळेल याचा कुठलाच भरवसा देता येत नाही. त्या जुन्या काळातही माझ्या मित्राने ही पुस्तके पोस्टाने मागवून घेतली होती.
प्रकाशक गोरखपुर किंवा लखनौ असे उ.प्र. मधील आहेत.
पुस्तक मूळ मराठीतले असले तरी मराठी प्रती संपून गेल्या असण्याची दाट शक्यता आहे. "क्रमिक पुस्तक माला" सुद्धा हिंदीतली विकत घ्यावी लागली होती. संगीत नावाची एक हिंदी पत्रिका होती त्यात अशा पुस्तकांच्या जाहिराती येत असत.
या विषयाला गिऱ्हाईक विशेष नाही (मराठी तर अजिबात नाही) याचा हा परिणाम असावा.
मला वाटते, आपण जर हिंदी पुस्तकविक्रेत्याच्या दुकानात चक्कर टाकलीत व हिंदीतल्या पुस्तकांची चौकशी केलीत तर प्रकाशकाचा पत्ता लागू शकेल. कोणी सांगावे मराठीतली पुस्तके त्या प्रकाशकाच्या गोदामात एखाद वेळा पडून असतीलही. कारण "क्रमिक" पेक्षा "पद्धती"ला फारच मर्यादित गिऱ्हाईक होते व असणार.
पण एक धोक्याची सूचना. "पद्धती" मधील विवेचन खूप सूक्ष्म, सविस्तर, कधी पाल्हाळिकही आहे, ते संगीतातल्या प्रगतीचा विशिष्ट टप्पा गाठलेल्या व गांभीर्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या उपयोगाचे असले तरी, तुमच्या-माझ्यासारख्या विशेष ज्ञान किंवा खोलवर रस नसणाऱ्याला रुचेलच/पचेलच असे वाटत नाही.
तरीही पुस्तक मिळालेच तर अमूल्य ठेवा म्हणून जपून ठेवण्याजोगे आहे निश्चित.
दिगम्भा