नमस्कार विचक्षणपंत,
मी आपल्या प्रतिसादाची वाटच पहात होते! असो. माझ्यासारखीने ४ ओळी लिहिल्याने संख्याशास्त्राला काही होणार नाही. कित्येक वर्षांपूर्वी पुलंनी बहुतेक 'पूर्वरंग' मध्ये म्हटले आहे, "व्युत्पत्तीशास्त्राइतकेच भोंगळ शास्त्र दुसरे कुठले असेल तर ते स्टॅटिस्टिक्सचे. ह्या दोन्हीमध्ये जादुगाराने टोपीतून कबूतर, कबूतरातून आणखी काही काढावे तसे कशातूनही काहीही निघते." (शब्द अगदी अचूक नसतील पण भावार्थ तोच आहे.) चर्चिल महाशयांनीही संख्याशास्त्राला बदनाम केलंय असं आपण म्हणाल! (पहा: एकलव्यांचा टॉप टेन-३ ला दिलेला प्रतिसाद.) तरी सुद्धा संख्याशास्त्राला काही धक्का लागला नाही. तर कोण्या मीरा फाटकने गमतीत चार ओळी लिहिल्या तर त्याची काय बदनामी होणार?
असो. महाविद्यालयात संख्याशास्त्र हा एक विषय मला शिकायला होता. तेव्हापासून संख्याशास्त्राबद्दलचे हे विनोद मी ऐकत आहे. त्यातले बरेचसे संख्याशास्त्रज्ञांनीच सांगितलेले आहेत! परवा मी माझ्या डोक्यातील विदागोदामातून ते मुठभर दाणे बाहेर काढून त्यांची पुरचुंडी बांधून सर्वांसमोर ठेवली इतकेच.
आपल्या प्रतिसादात आपणच दिशाभूल करणाऱ्या निष्कर्षांची उदाहरणे दिली आहेत. मला नेमके तेच म्हणायचे होते.
असे जो निष्कर्ष काढायची इच्छा आहे त्याला सोयीचा data घेऊन जर काम केले जाते आणि ..
कसं बोललात !! (द्या टाळी म्हणावसं वाटतंय!) एवढंच नव्हे तर कधीकधी तोच डेटा हवा तसा वळवलाही जातो. म्हणूनच हे निष्कर्ष विश्वासार्ह रहात नाहीत आणि विनोद जन्माला येतात.
अवांतर - संख्याशास्त्राप्रमाणेच गणित, पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र यांच्याबद्दलचेही विनोद असतात. संख्याशास्त्राबद्दलच्या विनोदांची संख्या अंमळ अधिक असते इतकेच.
असो. मी कवितेच्या (की वात्रटिकेच्या) सुरुवातीला सर्व संख्याशास्त्रज्ञांची क्षमा मागितली आहे. तेव्हा आता पुन्हा आपली क्षमा मागितली नाही तरी चालेल असे वाटते.
आपला प्रतिसाद आपण जसा हलकेच/गंभीरपणे लिहिला असेल तसाच माझाही प्रतिसाद हलकेच/गंभीरपणे घ्यावा.
-मीरा
(आतापर्यंत आलेल्या प्रतिसादात सुमारे ९४.४ टक्के प्रतिसाद सकारात्मक आहेत. म्हणजे जवळजवळ सर्वांनाच ही वात्रटिका आवडली आहे नाही का?!)