एकतर हॉटॆल च्या काचबंद शांत खोल्या. त्यात खिडक्या संपूर्णतः: पडद्यांनी झाकलेल्या. आंत थंडगार वातावरण, मऊ बिछाना व गुबगुबीत रजई. आता अशा परिस्थितीत सकाळी जाग येणे मुष्किल. मग रात्री स्वागतिकेला सकाळचा गजर सांगायचा, आपल्या भ्रमणध्वनीसंचावर गजर लावायचा आणि झोपायच्या आधी पडदा थोडा बाजूला सरकवायचा अशी जोरदार तयारी करावी लागते. नाहीतर उड्डाण चुकायचे आणि सगळाच गोंधळ व्हायचा.
असेच!
माझ्या साहेबाला व सहकाऱ्यांना माझ्या झोपेचे कुतूहल आहे. ते नेहमी म्हणतात तुला बरी विमानात झोप येते. आता न यायला काय झाले?
असेच.
आता हे उड्डाण जेमतेम १००-१०५ मिनिटांचे. पण आपल्याला काय फरक पडतो?
बरोबर! काय फरक पडतो?
झोपेचे अनेक प्रकार आहेत. लग्नाची नवलाई असतानाची पहाटे लागलेली साखरझोप, पुढे सौ कडून उद्धार होणारी 'कुंभकर्णाची' झोप, सकाळी गजर बंद करून 'अंमळ' पडल्यावर लागलेली बेसावध झोप, रविवारी दुपारी रस-पुरीचे जेवण झाल्यावरची तृप्त झोप, गाडीत सामान चोरीला जाऊ देणारी गाफील झोप, मस्त पैकी मित्रांसमवेत रात्र जागवल्यावर पहाटे लागलेली गाढ झोप, कचेरीतली पगारी झोप,रात्रपाळीच्या कामगारांनी रात्री व कामगार पुढाऱ्यांनी कामावर असताना भर दिवसा घ्यायची हक्काची झोप, परिसंवाद, विचारमंथन बैठक वगरे मध्ये दुपारी भोजनानंतर सभागृहातले दिवे मंद करुन साहेब आपले 'दृक-श्राव्य' सादरीकरण सुरू करताच अनावर होणारी घातक झोप, वक्ता पकाउ भाषण लांबवू लागला की येणारी साहजिक झोप, जलद गाडीत अचानक बसायला जागा मिळताच येणारी अचानक लाभाची झोप, लांबच्या विमानप्रवासातली नाइलाजाची झोप, विद्यार्थीदशेत परीक्षेच्या वेळी रात्री अभ्यासाला बसल्यावर येणारी हमखास झोप, निकाल लागल्यावरची समाधानाची झोप.
वा वा वा!
===
मागे एकदा प्रवासींनी त्यांच्या झोपेबद्दल असेच काहीसे एका प्रतिसादात लिहिले होते. मला सापडले नाही. कोणाला सापडले तर इथे दुवा देईल का?