नमस्कार सर्वसाक्षी!

चीनमधील विविध ठिकाणांबद्दल तुम्ही सांगितलेली माहिती वाचून छान वाटलं! सप्टेंबरच्या शेवटाला चिनी राष्ट्रीय सुट्टी आहे, तेंव्हा जरा फोशानमधून कुठेतरी सहलीसाठी बाहेर पडायची इच्छा आहे. एरवी दररोज हॉटेल ते ऑफिस आणि महिन्याभराने फोशान ते शांघाय किंवा हाँगकाँग इतकाच प्रवास घडला आहे!

बाकी चिनी भाषेतील उच्चार आणि त्यांची इंग्रजीतील स्पेलिंग्स हा एक वेगळाच विषय होऊ शकेल नाही का? स्पेलिंगबरहुकुम उच्चार केला तर 'ग्वांगझोऊ', परंतु आमचे चिनी सहकारी किंवा विमानतळावरील सूचना ऐकल्यास हाच शब्द 'गांज्योऊ' असा काहीसा ऐकू येतो! आपण ज्याला ग्वांगडाँग प्रांत म्हणतो त्याचा हे लोक 'गांदोंग' किंवा 'गांदुंग' सदृश उच्चार करताना ऐकले आहे.

विषयांतराबद्दल क्षमस्व, परंतु रेल्वे स्टेशन्स, विमानतळ अशा ठिकाणी केल्या जाणाऱ्या घोषणांमधून आपल्याला हवी असलेली माहिती शोधताना 'मति गुंग होणे' चा प्रत्यय येतो. त्यातून चीनमध्ये क्यू या इंग्रजी अक्षराचा उच्चार 'च' सारखा होत असल्याने सुरुवातीला फारच गोक्वी (गोची) व्हायची!  असो!

~ संदीप