धन्यवाद!! :-)
'विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे' मिळाली.
नंदन यांनी दिलेल्या संकेतस्थळावर विचक्षण यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला आणि ही सुरेख कविता सापडली.
एका कथेत कवितेची एक ओळ वाचली आणि ती कविता पूर्ण वाचावी वाटली. आणि मग (अर्थातच) मनोगत ची आठवण आली.
आणि माझ्या 'अर्थातच' ला सार्थ ठरवत मनोगतींनी मला कविता सापडवून दिली.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!
कविता येथे देत आहेः
हात तुझा हातात अन धूंद ही हवा
रोजचाच चंद्र आज, भासतो नवा
रोजचेच हे वारे, रोजचेच तारे
भासते परी नविन विश्व आज सारे
ही किमया स्पर्शाची, भारीते जीवा
या हळव्या पाण्यावर, मोहरल्या छाया
मोहरले हृदय तसे, मोहरली काया
चांदण्यात थरथरतो, मधुर गारवा
जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो
स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो
बिलगताच जाईचा उमलतो थवा
क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज, रक्तातून वाहे
आज फुले प्राणांतून, केशरी दिवा