सोनाली, गीताताई,प्रवासी,मृदुला, भास्कर(ले. आणि के.),विनायकजी,व्यक्तीगत निरोपातून अभिप्राय देणारे प्रशंसक, 
माझा हा लेख आपणा सर्वांना आवडला याचा मला आनंद झाला.

जाहिराती आपले जीवन किती व्यापून आहेत, हे आपल्याला आता जाणवतही नाही. अर्थातच मनाला भिडणार्‍या आणि आठवणीत राहणार्‍या जाहिराती बनवणे हे कौशल्याचे काम आहे आणि त्या बनवणार्‍या जाहिराततज्ञांना माझा सलाम. ते 'सबकॉन्शस माईंड' कि कायसं म्हणतात ना, त्यात जाऊन दडून बसतात हो या जाहिराती..आणि बाजारात गेल्यावर बाहेर येतात..

भैरुप्रमाणे मी स्वत: पण रोज दात घासल्यावर त्यावर बोट घासून 'च्युक' आवाज येतो का ते तपासते!विशीष्ठ आटा वापरुनही माझ्या पोळ्या जाहिरातीतल्यासारख्या 'सिर्फ दो उंगलीसे' नाही तुटल्या कि नाराज होते. ओष्ठशलाकेची कांडी जाहिरातीतल्यासारखी छान आपल्याला का लावता येत नाही म्हणून कधीकधी हिरमुसते. कधीकधी ग्राहकाला मठ्ठ समजून शेंडी लावू पाहणार्‍या काही जाहिरातींनी वैतागतेही. त्यातल्या काही म्हणजे 'सोडीयम कि मात्रा कम' असणारे नमक, सर्व डर्ट ब्लास्टर आणि वॉश बूस्टर वाले धुलाईसाबण(जी भपकेबाज नावे जाहिरातीत वापरतात ती रसायने खरेच अस्तित्वात आहेत का हो?कि आपलं सामान्य गृहिणींना गंडवायला?),'व्हिटामीन आणि फ्रुटामीन' वाले केशसाबण(केसांना बाहेरुन व्हिटामीन लावून कसे भागणार हो?), आणि 'प्रितीचा विश्वास' असलेले लोणचे(लोणच्यासारख्या आंबट पदार्थाला प्रेमाचा विश्वास वगैरे म्हणणे म्हणजे जरा अतिशयोक्तीच ना हो?).. 

माझ्या आवडत्या जाहिराती म्हणजे डेअरी मिल्क(नाचत नाचत क्रिकेटवीराकडे जाणारी मुलगी), चिकलेट(अतुल परचुरेची)..

स्वत:ला काय आवडतं आणि काय झेपतं हे जाहिरातींवरुन नाही, स्वत:च्या अनुभवावरुन ठरवावं. 'सुनो दिलकी आवाज' असं कोणत्यातरी जाहिरातसंताने म्हटलं आहे तसं.(बघा,त्यातही जाहिरात आलीच!)
आपली(जाहिरातप्रेमी)अनु   

ता.क.-प्रवासी, मला आईने लहानपणी 'मेंदूला तरतरी देते आणि शक्ती वाढवते' ते रसायन दिले नाही, बाबांनी देण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ते आवडायचे नाही. (काही वर्षांनी जेव्हा आवडायला लागले तेव्हा त्याच्या किंमती आकाशाला भिडल्या होत्या!!)
भास्कर(के),आपले निरिक्षणही आवडले!'बर्फात ओठांना मुलायम' ठेवायला साय अथवा तूपच उत्तम!