मराठी भाषेत शास्त्र व विज्ञान हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरून फार मोठा गोंधळ निर्माण करून ठेवला गेलेला आहे. सोवळे ओवळे, उपास तापास वगैरे अनेक परंपरागत गोष्टी हिंदू धर्म"शास्त्रात" व्यवस्थित बसतात. मनातून एखादी गोष्ट करायची नसेल तेंव्हा आपण "शास्त्रा"पुरती थोडीशी करतो. इथे विज्ञानाचा संबंध येत नाही.
पण विज्ञान या विषयामध्ये तर्कशुद्ध विचार असणे महत्वाचे असते. ध्वनीस्पंदने, विद्युतलहरी अशा संकल्पना भोंगळपणे वापरण्याला तेथे वाव नाही. त्यांच्या ऊर्जेचे मोजमाप, कंपनसंख्या, शरीरावर त्याचा होणारा निश्चित परिणाम, त्याचे मोजमाप वगैरे समजणे आवश्यक असते. कोणी शोध लावला यापेक्शा तो कसा सिद्ध केला गेला हे महत्वाचे असते. विज्ञानाचे नियम स्थळकाळातीत असतात. कोणीही ते सप्रयोग सिद्ध करू शकतो. आधीच एक निश्कर्ष गृहीत धरून त्याअनुशंगाने मुद्दे मांडणे नीतिशास्त्र, पाकशास्त्र, विधिसंस्था वगैरेमध्ये ग्राह्य असेल पण ते विज्ञानाला धरून नाही. तिथे आधी एखादा प्रयोग करून त्यातील निरिक्शणाचा सखोल अभ्यास करून त्यावरून निश्कर्ष काढावा लागतो.