स्वातंत्र्यपूर्वकाळात नेत्यांच्या एका हाकेसरशी बहुतांश लोक परदेशी राज्यकर्त्यांविरुद्ध एकत्र येऊन लढा देत असत. पण स्वातंत्र्योत्तर काळात संपूर्ण/बहुतांश देशाला अशी एक दमदार हाक देणारा नेता लाभला नाही असे वाटते. हेच लोकशाहीचे यश आणि अपयश आहे असे वाटते.
खरेतर इथे दोन मुद्दे आहेत.
पहिला म्हणजे असा दमदार नेता लोकशाहीमध्ये समाधानी असेल का? की त्याची/तिची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होईल?
दुसरा मुद्दा अधिक महत्वाचा. हा एक सार्वत्रिक आणि सार्वकालिक मुद्दा आहे. तो म्हणजे असा दमदार नेता (म्हणजे एक व्यक्ती) उभा राहण्याची आपण वाट पाहतो. जगात सर्व राष्ट्रात, सर्व धर्मात असे स्वप्न लोक पाहतात. कोणी एक देवदूत येईल आणि सगळे ठीक करील. हा खरेतर आपल्या आळशीपणाचा पुरावा असतो असे मला वाटते. कारण असा कोणी येणार असेल तर मग आपल्याला काहीच करण्याची गरज नसते, आपण आपले सुखासीन आयुष्य जगायला मोकळे. लोकशाहीचा गाभा म्हणजे सामूहिक नेतृत्व, त्यालाच आपण अशा अपेक्षेने छेद देत नाही का?
आणखी एक म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांकडे गमवावे असे -स्वतःच्या जीवाशिवाय- फारसे काही नव्हते. हल्ली सामूहिक जबाबदारीपेक्षा 'प्रायव्हसी' ला, वैयक्तिक जीवनाला अधिक मह्त्व आले आहे. आज एखादा गांधीबाबा जरी सर्वस्व पणाला लावून उभा राहीला तरी त्याला मूठभर अनुयायी तरी मिळतील का? ती समर्पण-भावना तुमच्या-आमच्यात तरी उरली आहे का? वैयक्तिक जीवनाच्या अतिरेकी कल्पनांमुळे आपण ती केव्हाच गमावली आहे. नादान, संधिसाधू लोक राज्य करतात हे खरे, गांधीबाबासारखा, जयप्रकाशांसारखा एखादे 'नवनिर्माणाचे' स्वप्न पाहणारा नेता नाही हे ही खरे, पण आपण या लोकशाहीचा भाग म्हणून आपले कर्तव्य किती पार पडतो हे ही पडताळून पहावे लागेल.
तसेच एखादा हुकूमशहाच ही परिस्थिती बदलू शकेल असे म्हणताना त्याचे संभाव्य परिणाम आपल्याला मान्य असतील का हा ही विचार करणे गरजेचे आहे. आणिबाणीच्या काळात भ्रष्टाराचे निर्मूलन झाले नाही तरी तो खूपच नियंत्रणात होता (असे म्हणतात), सर्व यंत्रणा योग्य प्रकारे काम करीत होत्या वगैरे एका अर्थी सुशासन होते (म्हणून विनोबांनी त्याला अनुशासनपर्व म्हटले होते) परंतु हे सर्व धाकाने घडत होते, विचाराने नाही. म्हणूनच अखेर जनतेने इंदिराजींना सत्तेतून पाय-उतार होण्यास भाग पाडले.
पुनर्रचना हवी आहे ती जनसामान्यांच्या मानसिकतेची. ही मानसिकता बदलण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण आहे असे वाटते.
१००% सहमत. वर तुमच्या या मुद्द्याचे समर्थन करणारा एक मुद्दा आला आहे.यासाठी आपण म्हणता त्याप्रमाणे शिक्षण हा एकच मार्ग आहे. याच कारणाने कट्टर धार्मिक संघटना नव्या ज्ञानाला विरोध करतात. कारण मग सर्वाना बऱ्या-वाईटाचे ज्ञान होईल आणि आपोआपच त्यांचे महत्व कमी होईल.