गणितामधील कुठलाही मूळ नियम मानव बनवू शकत नाही. दोन अधिक तीन पांचच होणार, किंवा चौरसाचे क्षेत्रफळ त्याच्या भुजेच्या वर्गाइतकेच भरणार. या गोष्टी संपूर्णपणे नैसर्गिक आहेत. तीन तीन केळी चार वेळा घेतली म्हणजेच तीन हा आकडा चार वेळा घेतला तर बारा हे उत्तर येणारच. संगणक हे उत्तर अशाच प्रकारे वारंवार बेरीज करून काढतो. तीन चोक बारा हा पाढा पाठ करून गुणाकार करणे हा मानवाने बनवलेला एक सोपा मार्ग आहे. गणितातील कुठलेही सूत्र हा निसर्गाचे नियम व्यवस्थितपणे मांडण्याचा, सुलभपणे लक्षात ठेवण्याचा व त्यातून तर्कशुद्ध असा निष्कर्श काढण्याचा एक मार्ग असतो. निसर्गाच्या निरीक्षणातूनच तो निघतो. आपल्या मनाप्रमाणे बदलता येत नाही. कायदा बदलून टॅक्सीच्या भाड्याचे कोष्टक मानव बदलू शकतो, अडीचकी किंवा साईन, कोसाईन वगैरेची कोष्टके तो फक्त आपल्या बुद्धीचा उपयोग करून निसर्गाच्या नियमांचा अभ्यास करून बनवतो, त्यात आपल्या मनाने फेरफार करू शकत नाही.
अर्थातच गणित हे शंभर टक्के विज्ञानच आहे.