लिखाळ आणि इतर मनोगती,

माझ्यामते ही (अशीच) गोष्ट शुक आणि व्यास यांच्याबद्दल आहे.  बौद्ध काल हा महाभारतकालानंतरचा मानला तर महाभारतावरूनहि झेन तत्वज्ञानात आली असण्याची शक्यता आहे.

शुक हे महर्षि वेदव्यासांचे चिरंजीव.  त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता आणि त्यांना अध्यात्माची गोडी लागली.  तेव्हा ते घर सोडून अरण्यात तपश्चर्येला निघाले.  आपला मुलगा तरूणपणामध्ये घराचा त्याग करून जातो हे पाहून पितृहृदय कळवळून श्री वेदव्यास त्याची विनवणी करीत शुकाच्या मागोमाग जाऊ लागले.

शुक निर्धाराने आणि निरीच्छेने पुढे पुढे जात होते आणि मागे मागे व्यास आपल्या मुलाला तू जाऊ नकोरे असे काकुळतीने म्हणत जात होते.  जाताना वाटेमध्ये एकेठिकाणी काही स्त्रिया नदीमध्ये स्नान करीत होत्या.  शुक त्यांच्यासमोरून गेला तरी त्यांचे स्नान पहिल्यासारखेच चालू होते.  नंतर जेव्हा श्री व्यासमुनि तिथे आले तेव्हा लगेच त्या स्त्रिया आपाआपली वस्त्रे गोळा करून आडोशाला गेल्या.  व्यासांना याचे खूप आश्चर्य वाटले.

पुढे त्यांनी शुकाला गाठल्यावर व्यासांनी ते आश्चर्य व्यक्त केले.  मी इतका वयस्क आणि ज्ञानी मुनी असून त्या स्त्रियांना माझ्यासमोर येण्यास संकोच कसा?  तू तर तरूण वयाचा असून स्त्रियांनी तुझ्या येण्याची दखल सुद्धा घेतली नाही असे कसे?

तेव्हा शुक त्यांना म्हणाले की "तात, तुम्ही पुत्रवियोगाने व्याकूळ झाला आहात.  याचाच अर्थ तुमच्या मनात अजून आसक्ति आहे.  आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव त्या स्त्रियांनी घेतली नाही म्हणजे मी माझ्या अध्यात्माची परीक्षा उत्तिर्ण झालो.  तेव्हा आता आपण आपला शोक बाजूला ठेऊन मला अध्यात्माचा मार्ग अनुसरण्यामध्ये मदत करा"

कलोअ,
सुभाष