शाळेत असताना हिंदीच्या पाठ्यपुस्तकात "हवा कहे, सूरज करे" या नावाचा एक धडा होता.

एका गावाला पाणवठ्याची गरज असते. सूर्य आणि वाऱ्यात पैज लागते की गावातल्या लोकांना हाताशी धरून पाणवठा बांधून दाखवेल तो जिंकला. वारा माणूस बनून गावात जातो, चौकाचौकात सभा घेतो, लोकांना पाण्याचे महत्त्व आणि पाणवठा बांधण्याचे फायदे समजावून सांगतो. त्याच्या भाषणांनी गावकरी प्रभावीत होतात पण पाणवठा काही बांधत नाहीत.

मग सूर्य माणूस बनून गावात जातो. तो रोज सकाळी उठायचा कुदळ, फावडे आणि घमेले घेऊन पाणवठ्याच्या जागी जाऊन दिवसभर जमीन खणायचा. ते पाहून हळूहळू त्याच्याबरोबर सारा गाव त्या कामावर रुजू झाला.

प्रत्यक्ष कृतीचे महत्त्व हे असे असते. हेतू कौतुकाचा असो अथवा नसो, प्रत्यक्ष कृतीने जनमानसावर मोठा प्रभाव पडतो असे वाटते.

त्याकाळी सकल देशाचे नेतृत्व वाहणारे लोक आपल्या आश्रमात चतुर्वर्ण पाळीत असत असे ऐकून/वाचून आहे. त्यांची केवळ भाषणे ऐकावीत; पण त्याच काळात सावरकरांनी प्रत्यक्ष कृतीतून जातिभेद मिटवायचा प्रयत्न केला. यात फक्त ब्राह्मण-ब्राह्मणेतर जातिभेद नव्हे तर सर्वंकश जातिभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तथाकथित दलित वर्गातही वरच्या-खालच्या जाती असे वर्गीकरण होते/आहे आणि तेही एकमेकांशी रोटी-बेटी व्यवहार करत नसत/नाहीत असे ऐकून/वाचून आहे.

कोल्हापुरच्या शाहू महाराजांनीही अशा सर्व जातीच्या लोकांच्या एकत्रित पंगती बसवल्याचे आठवते.