ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले असतील का नाही माहीत नाही. साध्या तर्काने ही दंतकथा वाटते - त्यांनी केलेला चमत्कार नाही. असली तर असली नसली म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही.

पण अगदी तरूण वयात (१६-२४), त्यांनी लिहीलेली ज्ञानेश्वरी (भावार्थ दिपिका), अमृतानुभव व असंख्य अभंग/ओव्या हा खराखुरा चमत्कार वाटतो. एव्हढे विश्वाचे आणि मनुष्याबद्द्लचे ज्ञान त्यांना कसे लाभले हा कुतुहलाचा विषय आहे.शिवाय याच वयात (संजीवन समाधी घेण्याआधी) त्यांनी भागवत धर्म (वारकरी संप्रदाय) स्थापला आणि कुणावरही टिका न करता सहजतेने सर्वजातींना एकत्र आणायचा प्रयत्न केला. म्हणून काहीजण त्यांना बंडखोर समजतात. कवी बीं नी तर ज्ञानेश्वरांनी क्रांती ऐवजी "शांतीमय उत्क्रांती" केली असे म्हणले आहे. असाच प्रकार आदी शंकराचार्यांचा आणि अनेक इतर संत अथवा बहीणाबाईंसारख्या साहीत्यिकांचा आहे.

त्यांच्या आळंदीतील भिंती बद्द्ल ऐकावातील गोष्ट अशी आहे की ती भिंत गेल्या काही वर्षांपर्यंत (१९००च्या) अस्तित्वात होती (!). पण लोक "ती" भिंत प्रसाद म्हणून खाऊ लागले अथवा टवका घरी नेऊ लागले. मग सरकारने/संस्थानाने त्या भिंतीवर आवरण करून दुसरी दगडी भिंत बांधली आणि त्यावर कुलकर्णी भावंडांचे छोटेसे देऊळ केले. आता लोक या बाहेरच्या भिंतीचेच दर्शन घेतात!