बरोब्बर. आणखी एक जाणून घ्यायचे आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे.
उदाहरणार्थ: एखाद्या प्रसिद्ध, सार्वजनिक व्यक्तीबद्दल उद्या जाहीररीत्या लिहिले 'टग्या हा टग्या म्हणून मोठा असला माणूस तसा वाईटच, कॅरेक्टर खराबच, असे मी ऐकले आहे. त्याच्या जवळच्या लोकांनी मला तसा सांगितले आहे." (हे केवळ उदाहरण आहे आणि टग्याबद्दल मला केवळ आदर आहे, हे वेगळे खरेतर सांगायला नकोच)
अशावेळी मानहानीचा कायदा काय म्हणतो? तो माणूस (इथे गांधी घेऊ या) अशावेळी कुठली कारवाई करू शकतो? किंवा त्याचे (गांधीजींचे) वारसदार कुठले कायदेशीर पाऊल उचलू शकतात?
पुन्हा, कायद्याचं माझं ज्ञान शून्य असल्यामुळे याबाबत खात्रीलायक काही सांगू शकत नाही. पण माझा अंदाज असा आहे की असं वक्तव्य जरी खाजगी आयुष्याबद्दल असलं तरी ते सार्वजनिक व्यक्तीच्या खाजगी आयुष्याबद्दल असल्यामुळे, onus of proof (or disproof) त्या सार्वजनिक व्यक्तीकडेच जावा. म्हणजे थोडक्यात असं विधान खरं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी विधानकर्त्याकडे नसून, ते खोटं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या सार्वजनिक व्यक्तीच्या खांद्यावर असावी. अर्थात ते विधान खोटं आहे हे ती सार्वजनिक व्यक्ती सिद्ध न करू शकल्यास विधानकर्त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये.
अर्थात याबाबत खरं काय यावर कायदेतज्ज्ञच प्रकाश पाडू शकतील.
फारा वर्षांपूर्वी मोरारजी देसाईंनी सेमूर हर्श या अमेरिकन पत्रकाराविरुद्ध अमेरिकन कोर्टात मानहानीचा दावा केला होता. 'मोरारजी देसाई हे सीआयएचे हस्तक होते' अशा अर्थाचं विधान हर्शनी केल्याबद्दल हा दावा होता. हा दावा मोरारजी देसाई हरले होते. या दाव्याच्या तपशिलांबाबतही माहिती मिळू शकल्यास कदाचित यावर थोडा प्रकाश पडू शकावा, आणि interestingही ठरावं.
(लोकमान्य टिळकही 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हटल्याबद्दल चिरोलसाहेबाविरुद्ध मानहानीचा खटला करून हरले होते, असं ऐकिवात आहे. अर्थात माझा इतिहास थोडा कच्चाच असल्यामुळे तपशिलात चूक असल्यास दुरुस्त करून घ्यावी. आणि तसंही लोकमान्य तो खटला नेमक्या कोणत्या कारणासाठी हरले, याचाही तपशील माझ्याजवळ नाही; तोही कळून घ्यायला आवडेल.)
आणि अशा सार्वजनिक माणसाच्या (उदाहरणादाखल गांधींच्या) वारसदारांबद्दल म्हणाल, तर शहाणे असतील तर त्यांनी कोणतीही कायदेशीर अथवा बेकायदेशीर (पण बेकायदेशीर कारवाई करायला गांधी किंवा त्यांचे वारस काय संभाजी ब्रिगेडवाले थोडीच आहेत?) कारवाई करण्याच्या भानगडीत पडू नये. तसाही काही उपयोग होईलसं वाटत नाही. आणि त्यातून लोक काय, वाटेल ते बोलतात*, त्याला अशी किती किंमत द्यायची?
- टग्या.
(*याला पुष्टी देणाऱ्या काही समर्पक मराठी म्हणी केवळ मनोगतावरील सभ्य भाषेच्या अपेक्षेमुळे जशाच्या तशा देऊ इच्छीत नाही, पण 'राजाच्या पाठीमागे लोक त्याच्या ancestry/pedigree [मराठी प्रतिशब्द?]बद्दल शंका व्यक्त करणारी विधानं करतात; तोंडासमोर बोलायची कोणाची हिंमत नसते' आणि 'लोक दोन्ही बाजूंनी बोलतात - उत्तमांगानंही आणि अधमांगानंही' असा त्यांचा [सभ्य भाषेतला] उल्लेख पुरेसा ठरावा - समझनेवाले को इशारा काफी!)