अजितसिंगांना फाळणीची बातमी व निश्चिती समजली. ते पार खचून गेले. ज्या सिंधू कुटुंबातील पुरुषांनी ज्या मंगलभूमीवर स्वातंत्र्यसूक्ताचे महन्मंगल पाठ गायिले, ज्या भूमीवर त्यांच्या स्त्रियांनी आपल्या लेकरांना बलिदानाची प्रेरणा देणारी अंगाई गीते गायिली, त्या भूमीवर हिरवा सुलतानी अंमल सुरू होणार, त्यांचे गाव, जमीन सगळे पाकिस्तानात जाणार होते. लाडक्या भगतने ज्या लाहोरमध्ये शौर्यकृत्य गाजवले आणि ज्या लाहोर तुरुंगात तो फासावर गेला ते लाहोर आता हिंदुस्थानात राहणार नव्हते. म्हणजे काय? कसला पाकिस्तान? आम्ही तर अखंड हिंदुस्थानासाठी हयातभर लढलो मग आता हे काय? या फाळणीने काय साध्य होणार?
सरदार अजितसिंग ह्यांची मानसिक अवस्था कल्पनेतही वर्णिता येणार नाही. पारतंत्र्यातून मुक्ततेच्या आनंदावर फाळणीचे पराकोटीचे दुःखद सावट अनेकांना निराशेच्या गर्तेत फेकणारे ठरले असणार. स्वतःला संपविण्याचा सरदार अजितसिंगांचा निर्णय ह्याच विफल अवस्थेत घेतला गेला असावा.
सरदार अजितसिंगांना विनम्र अभिवादन.