' संतकृपा ' म्हणून एक मराठी मासिक आहे. त्यात डॉ. ग. नि. जोगळेकर यांचा नियमितपणे एक लेख असतो ज्यात ते विविध विषयावर विवेचन करतात. पैकी एक उतारा देत आहे -
     " संत ज्ञानेश्वरांनी रेड्याचे तोंडून वेद वदविले या गोष्टीचे वैषम्य का वाटावे हे कोडे न सुटण्यासारखे आहे. आम्ही मानव असून आम्हाला वेदविद्यचा गंध नाही आणि संत मंडळी निर्बुद्ध मानल्या गेलेल्या, म्हणजे मानव ज्यांना निर्बुद्ध मानतो अशांच्या तोंडून वेद वदवितात हे कसे शक्य आहे अशी शंका त्यांना येते. मध्यंतरी कर्नाटक शासनाने चंदनचोर विरप्पन याला यमसदनास धाडले तर अनेक मानवांचा त्यावर विश्वासच बसेना. ' मारला गेला तो विरप्पन कशावरून ' अशी शंका त्यांचे मनात आली. तानाजी कोंडाणा सर करायला गेला त्यावेळी कडा चढण्यासाठी घोरपडीला दोर लावून वर गेला असे लोकमानसांत रूजलेले असताना या मानवाच्या मनात ' हे कसे शक्य आहे ' हा विचार असतो. छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला आणि विजापूरकरांचा एवढा मातब्बर सरदार धरणीवर लोळवला म्हणून देशातील मुले अभिमान बाळगतात तर यांच्या मनात शंका की ' शिवाजीची कुडी इतकी लहान असताना एवढे अवाढव्य धूड तो मारू शकेल यावर विश्वासच बसत नाही '. अशा मानवांना शंका घेत घेत त्यंचे आयुष्य त्या कारणी समर्पित करण्याची मुभा आपण द्यावयास हवी. " ह्या उतारातील शेवटचे वाक्य उपहासाने लिहिलेले दिसते.
         आता चर्चेच्या विषयाबद्दल मला काय वाटते. श्री ज्ञानेश्वर हे एक निष्णात योगी होते. पाठीवर मांडे भाजता येतील इतका जठरातील वैश्वानर प्रदीप्त करणे, अचेतन भिंत चालविणे  ह्या गोष्टी योग्याला घडवून आणणे कठीण नाही. चांगदेव भेटायला आला तेव्हां तोही वाघावर बसून व एका सापाचा चाबूक बनवून आला. पण वाघ व साप दोन्ही चेतन असल्यामुळे त्यांना आटोक्यात आणणे अचेतन भिंत चालविण्यापेक्षा सोपे आहे. माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी  म्हटले आहे की ब्रह्मत्वाला पोचलेल्या महात्म्याला अष्टसिद्धि हात जोडून उभ्या असतात. मग तो स्वर्गलोकात चाललेली संभाषणे ऐकू शकतो, मुंगीच्या मनांतले विचार ओळखू शकतो वगैरे. आणि माझी ठाम समजूत आहे की ज्ञानेश्वरांसारखे प्रभूति ऐकीव माहिती आपल्या ग्रंथात लिहिणार नाही. जे अनुभव सिद्ध नाही ते लोकांना रंजविण्यासाठी लिहिलेला हा ग्रन्थ नव्हे. नुकतेच कुठेतरी वाचले की दक्षिण महासागरातील हिमनग गातात आणि वैज्ञानिकांनी त्याचे ध्वनीमुद्रण केलेले आहे. पण ती frequency मानवी कानाला आकलन होण्यासारखी नाही. जर चेतना नसलेले हिमनग गाऊ शकतात तर रेडा तर चेतन प्राणी. त्याच्या तोंडून वेद वदविण्याची कृति त्याचाकडून करवून घेणे कठीण नाही. आपण महात्म्यांचे चौकात जसे पुतळे उभे करतो तद्वत पैठणला ७०० वर्षांपासून त्या रेड्याच्या आठवणीचा एक खांब आहे म्हणतात. आता हा खांबही त्या ऱेड्याच्या निमित्ते कशावरून असेही म्हणता येईलच की.