माफ करा पण मला हा प्रश्न दोन व्यक्तिंमधल्या मतभेदाइतका साधा आहे असे वाटत नाही. त्यातून आपली वैचारीक जडणघडण दिसते. जाताजाता एखाद्याचे वस्त्र उतरवून ठेवणाऱी वृत्ती दिसते. 

यात त्रागा मुळीच नाही. अंगावर चिखल उडला तर आपण अंग चोरून घेतो व शक्यतो त्या ठिकाणी पुन्हा जाताना दहा वेळा विचार करतो तसे आहे हे. मूळ लिखाणापेक्षाही त्यात काही आक्षेपार्ह न वाटणे ही अधिक भयानक परिस्थिती आहे. मूळ लिखाण कदाचित एका आवेशात केले गेले असेल त्यामुळे निर्हेतुक टीका असेल परंतु हे लिखाण वाचणाऱ्या मंडळींना हे खटकत नसेल तर ती बधीर मानसिकता अधिक वेदनादायी आहे.

तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधू इच्छिता त्यांच्याकडून काही किमान अपेक्षा असतात. जे गांधींबद्दल अशी विधाने करण्यास कचरत नाहीत त्यांची विचक्षणांच्या लेखनाबद्दल वा विचाराबद्दलची प्रतिक्रिया कुठल्या थराला जाऊ शकेल हे सहज तर्क करता येण्याजोगे आहे. मते जुळत नाहीत हे खरे पण तसे व्यक्त करण्याची एक पातळी असते. कोणी त्याहून खाली जात असेल तर मला संवाद थांबवणेच इष्ट वाटेल.

मनोगताला माझ्या जाण्याने काही फरक पडत नाही हे खरेच, पण जर येथील लिखाण असे असेल तर मला नक्की पडेल , कारण असले लिखाण मला वाचावे लागणार नाही. (हे सगळे जर-तर आहे हे कृपया लक्षात घ्या) सुदैवाने अनेक सुजाण प्रतिसाद आले आहेत त्यामुळे ती वेळ येईल असे वाटत नाही, परंतु काय वाचणे टाळावे एवढे नक्कीच स्पष्ट होते आहे.

-विचक्षण