मिलिंद , विश्वमोहिनी ,
         आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. हिमनगाचे गाणे आणि रेड्याचे मंत्र म्हणणे ह्याची तुलना चुकीची आहे. प्रतीसादात काहीतरी घोटाळा होत आहे असे जाणवत होते. पण 'प्रतीसाद पाठवा' म्हणून कळ दाबून झाली होती, आणि कुठे घोटाळा झालाय हे नंतर पाहू असा विचार केला. पण आपण ते दाखवून माझ्या डोक्याचा ताण लवकरच कमी केलात. धन्यवाद.
         पण आता माझ्या मनांत शंका आणि अविश्वास , व ' अविश्वासातूनच विज्ञानात मोठमोठे शोध लागतात ' ह्याबद्दल एक वेगळाच प्रश्न निर्माण झालाय. माझ्या मते जिज्ञासेपोटी शोध घेणे - " हे खरच असू शकेल का ? आणि असेल तर त्यामागे काहीतरी कारण असणे जरूरी आहे" , आणि " हे असं असूच शकत नाही, कारण मी अनुभविलेले नाही (पहिले नाही म्हणा हवे तर) " म्हणून अविश्वास दाखविणे, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पहिल्या प्रकारच्या संशयात संशय निरसन करून घेण्यासाठी काही विशिष्ट प्रयत्न लागतात, काही विशिष्ट पात्रता लागते ह्याची जाण असते. ती जर आपल्याजवळ नसेल तर जे कोण ती सांगतो त्या माणसाच्या पात्रतेची जाण असते म्हणून त्यावर विश्वास असतो. आता तुम्ही दिलेल्या उदा. जर कोणी "तुम्ही (वा सर्व जग) सांगते पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण मी तर रोज बघतो त्याप्रमाणे सूर्यच तर पृथ्वीभोंवती फि्रतो " असे म्हणत तर असेल तर तो अविश्वास झाला, त्याच्या मागे शोध वृत्ति नसते. आणि अशा अविश्वासाला औषधच नाही.
        दुसरे नमून करावेसे वाटते की, कोणी (खरे) संत आपण केलेले चमत्कार (खरे तर ते करत नाहीतच, ते घडतात) ह्यांची कधीही, अगदी चुकूनही चर्चा करीत नाहीत. त्यामुळे श्री. ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविले हे आपणहून सांगणे अपेक्षितच नाही. ते जरी ज्ञानी असले तरी आपणहून कोणताही ग्रंथ त्यांनी लिहिला नाही. चांगदेव पासष्टीच्या वेळेस कोरा कागद बघून निवृत्तिनाथ म्हणाले, कागद कोरा आहे त्या अर्थी चांगदेव  अजून शुद्ध आहे, ज्ञाना त्याला बोध कर. (घटनेकडे बघायचा दृष्टीकोनही किती वेगवेगळे असतात, मुक्ताबाई तर कोरा कागद बघून हसली - म्हणाली शेवटी कोराच का ? ) निवृत्तिनाथांना त्यावेळच्या सामान्य जनाबद्दल कळवळा येऊन त्यांनी ज्ञानदेवांना जेव्हां आज्ञा केली तेव्हां ' भावार्थदीपिका ' उदयाला आली. तीही भ. गीतेवरील टीकाच. कृष्ण भगवान काय सांगतील तेच विषद करायचे. आपले म्हणणे त्यात घुसवायचे नाही. म्हणून ती झाल्यावर निवृत्तिनाथांनी ' आता स्वानुभवाचे कथन कर ' हा आदेश दिल्यावरच त्यांनी ' अमृतानुभव ' लिहिला. असे ज्ञानदेव आपले चमत्कार आपणच कथन करतील ?
        आता संशय,अविश्वास दाखवायला जागा असलेली एक गोष्ट सांगतो. साधारण ७०-८० वर्षापूर्वी एक संत होऊन गेले. श्री गुलाबराव महाराज. जन्मांध. त्यांनी ज्ञानेश्वरीवर जी टीका केली आहे त्याला तोड नाही. संपूर्ण (९००० श्लोक) ज्ञानेश्वरी त्यांना तोंडपाठ होती. त्यांनी ज्ञानेश्वर कसे असतील असे आपल्या ज्ञानचक्षूंनी जे चित्र काढले ते हुबेहूब ज्ञानदेवांसारखे आहे. त्यांनी ५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत आणि त्यातली काही संस्कृतामधून आहेत. जन्मांध एवढे सगळे करेल ? विश्वास बसणेच कठीण. पण हेही फार पूर्वीचे नाही. असो.
  वरील गोष्टीचा रेड्याकडून वेद वदविणेशी संबंध नाही, वा तुलनेसाठी नाही. संशय , अविश्वास आणि अविश्वासातून विज्ञानात शोध लागतात ह्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी मला जे सुचले ते सांगण्याचा एक प्रयत्न.