दसंजोप राव,

जिव्हाळ्याच्या विषयी लिहील्याबद्दल आभार!

जी.एं च्या कथेतील उपमा उत्प्रेक्षा, रूपके ह्या बरोबरच जी. एं च्या लेखनातील सर्वात भुरळ पाडणारा प्रकार म्हणजे आपल्या मनात घट्ट रुजलेल्या गृहीतकांना हादरा देणे. मला जी.एं ची 'प्रवासी' ही कथा भावते त्यासाठीच.

स्मशानात चितेवर पिठाचे गोळे भाजून खाणारा बैरागी आठवला की सर्वांगात अजूनही एक थरार जाणवतो. चितेवर भाजत ठेवलेले पिठाचे सात आठ गोळे आणि त्यापलीकडे अद्याप जळत असलेले प्रेत पाहून प्रवाशाची भूक मरते. आणि त्यावर, 'तुला अद्याप खरी भूक लागलीच नाही, खरी भूक येते तेंव्हा आतडी कुरतडत येते. त्यावेळी माणसाकडे नुसतं पाहताना देखिल त्याच्या मासात आपले दात रुतत असतात' हे बैराग्याचे उत्तर वाचकाला सुन्न करते.

प्रवासी, काय इस्किलार काय एका दमात वाचावी लागते आणि त्यानंतर किमान एक आठवडा तरी दुसरे काही वाचू शकत नाही अशी माझी तरी अवस्था होते.

कथेच्या शेवटी प्रवासी एका 'सुखी' कुटुंबा घरी जातो वरून सुखी आयुष्याचे सोंग करणारी त्या कुटुंबातील माणसे जेव्हा त्यागाची वेळ येते तेंव्हा एक मेकाच्या जीवावर उठलेली पाहून प्रवासाच्या मनात आलेले विचार जी.एं ची शब्द प्रतिभा आणि भाषेवरील सामर्थ्य आणि प्रगल्भता दाखवुन देतात.

 स्मशानात विझत चाललेल्या चितेभोवती काही माणसे बसलेली असावीत, मग विजेचा झक्कन प्रकाश क्षणभर दिसताच त्यात त्यांच्या दैनंदिन चेहऱ्याऐवजी, मांसहीन कवट्या त्यांचे खिजवत असलेले हसणे आणि डोळ्यांच्या जागी शून्य वर्तुळे दिसावीत व प्रकाश नाहीसा होताच पुन्हा मुखवटे परत यावेत असे त्याला वाटले.

यापुढे त्या पात्रांचे वर्णन हे - आयुष्याला मंद नाडीच्या चिंधीने चिकटलेला म्हातारा, आतून किडत आलेले मुलगे, चिरलेल्या पेरू सारखी दिसणारी लाल मांसल निर्लज्ज बेधडक स्त्री आणि गोठलेली मातीच्या गोळ्याप्रमाणे सुकत चललेली पोरं.....

ह्या उपमा सुचायला तीन महीने काय तीन वर्षे विचार केला तरी पुरेसे नाही. त्यासाठी जी.एं ची असामान्य प्रतिभाच असली पाहिजे.   

-वरुण