१. माझा जन्म हिंदू म्हणून झाला, त्यामुळे 'माझ्या' गोष्टींबाबत जी मला 'मम'ता वाटते, ती हिंदू धर्माबाबत वाटणे साहजिक आहे.

२. हिंदूंधर्मांतील कोणालाही  आपल्याच धर्मावर टीका करण्याचे व त्यांत बदल सुचविण्याचे स्वातंत्र्य आहे.

-- तत्त्वतः मान्य आहे. मात्र धर्मांतरितांना धर्मात पुनःप्रवेश देताना (पूर्वी) करण्यात येणारी आडकाठी, अस्पृश्यांना दिलेली वागणूक, 'गाय हा एक उपयुक्त पशू आहे' या सावरकरांच्या विधानावरील गदारोळ इ. अनेक गोष्टी हे विधान सर्वथैव सत्य नाही हे सिद्ध करण्यास पुरेसे असावे. अर्थात इतर धर्मांच्या मानाने भरपूर मोकळीक आणि लवचिकता आहे, हे खरे.

३. हिंदु तत्त्वज्ञान अधिक सकस व सकारात्मक आहे.

-- तुम्ही मांडलेला मुद्दा मान्य आहे. परंतु, अधिक सकस/सकारात्मक म्हणण्याऐवजी अधिक पर्यायांची शक्यता पडताळून पाहणारे, अधिक सर्वसमावेशक (Comprehensive) आहे असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरले असते, असे मला वाटते.

सहिष्णु वृत्ती आणि सर्वसमावेशकता हीच, हजारो वर्षांच्या परकीय दास्यानंतरही हिंदू धर्म टिकून राहिला आहे, याची मुख्य कारणे असावीत.