संजोप आणि वरुण यांच्यासारख्या आणि इतरही अनेक जी ए प्रेमींना - या विषयावर एक मार्मिक असा संवाद सुरू केल्याबद्दल आभार. मलाही जी एंचे लिखाण आवडते; माझ्या मगदुराप्रमाणे मी ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जी एंवर काहीनी फारच सुंदर लिहिले आहे. धों.वि.देशपांडे यांचे जी एं वरील पुस्तक त्यांच्या प्रतिभाधर्मातील, त्यांच्या अस्तित्त्वविषयक परिप्रेक्ष्यातील अनेक रहस्यांवर प्रकाश टाकणारे आहे. माधव आचवलांचा त्यांच्यवरील दीर्घ लेख त्यांच्या लिखाणातील रूपाचे रसग्रहण करणारा, त्यांच्या निर्मितिप्रक्रियेचा मागोवा घेणारा आहे. द.भि.कुलकर्णींचे त्यांच्यावरील लिखाणही (जरी त्यांच्या रूपककथांना "फसलेल्या" म्हणत असले तरीही )त्यांच्या एकंदर साहित्यातील स्थानाचे भान उत्तमपणे विशद करणारे आहे.
अर्थात श्रेष्ठ, जिनिअस कलावंत सर्व व्यापून दशांगुळे उरणारे ठरतात. जी एंचे वेगळे नाहीच. मला वाटते काही प्रश्नांची चर्चा (उपरोल्लेखित उत्तम समीक्षेच्या वाचनानंतरही) करणे इष्ट होईल. मला सुचेल तसे एक-दोन विषय मांडतो.
"नियतिवाद" म्हणा की काही अन्य; जी एंच्या लिखाणामागे काही एक भूमिका दिसते (तत्त्वज्ञान वगैरे शब्द मी न वापरलेले योग्य). हा विषय जी एंच्या बाबातीत बहुचर्चित असला तरी त्याची व्याप्ति अशी आहे की, विचार करणाऱ्या प्रत्येकास आपले "दोन पैसे" जरूर द्यावेसे वाटतील. या एका गहन अशा बाबीबद्दल काही उपप्रश्न किंवा मुद्दे -
ग्रीक शोकांतिकांचा जी एंवरील प्रभाव (प्रवासी/इस्किलार च्या निमित्ताने या विषयी बोलता येईल.)
तथाकथित अस्तित्त्ववादाचे जी एंच्या एकूण "भूमिके"शी असणारे नाते
जी एंच्या आणि एकूणच मराठी साहित्यातील , त्यांच्या रूपककथांचे स्थान
धन्यवाद